बीसीसीआयला मिळणार तब्बल ४० कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळला ( बीसीसीआय) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ मानलं जातं. आता बीसीसीआयच्या तिजोरीत आणखीन वाढ होणार आहे. आयसीसी महसूल वाटप रचनेनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला  ४० कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर दिले जाणार असल्याच लंडनमध्ये चालू असलेल्या वार्षिक परिषदेमध्ये मंजूर करण्यात आल आहे.

याआधी आयसीसीकडून बीसीसीआयला २९ कोटी ३० लाख डॉलर दिले जाणार होते .मात्र बीसीसीआयने त्याला विरोध केल्यानंतर आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांनी या आकडय़ात जवळपास १० कोटी डॉलरची भर घालण्याची संमती दिली. त्यानुसार बीसीसीआयला ११ कोटी २० लाख डॉलर वाढवून मिळाले आहेत.

भारता पाठोपाठ इंग्लंडला २६ कोटी ६० लाख डॉलर इतकी रक्कम मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेश यांना प्रत्येकी १२ कोटी ८० लाख डॉलर मिळतील, तर झिम्बाब्वेच्या वाटय़ाला ९ कोटी ४० लाख येणार आहेत.

आयसीसीच्या १५३ कोटी ६० लाख डॉलर नफ्याच्या रकमेपैकी बीसीसीआयच्या वाटय़ाला २२.८ टक्के रक्कम येणार आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाला ७.८ टक्के, अन्य मंडळांना ७.२ टक्के आणि झिम्बाब्वेला ५.३ टक्के हिस्सेदारी मिळेल.