fbpx

बीसीसीआयने दिले रिषभ पंतला इंग्लंडला रवाना होण्याचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा : ऐन विश्वचषकात भारतीय संघाला शिखर धवनच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा काहीसा समतोल ढासळताना दिसत आहे. यासाठी भारतीय निवड समितीकडून पर्यायी खेळाडूंची चाचपणी सुरु होती. या पर्यायी खेळाडूंच्या यादीमध्ये रिषभ पंत , श्रेयस अय्यर, अंबाती रायडू यांची नावं आघाडीवर होती. तर आता भारताच्या निवड समितीने रिषभ पंतला इंग्लंडला रवाना होण्याचे आदेश दिले आहेत. रिषभ पंत हा राखीव खेळाडू म्हणून इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे.

शिखर धवनला झालेली दुखापत ही भारतीय संघाच्या वर्ल्ड कप मोहीमेला बसलेला मोठा धक्का मानली जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानं शतकी खेळी करून फॉर्म परत मिळवला होता, परंतु त्याच सामन्यात झालेल्या दुखापतीमुळं त्याला वर्ल्ड कप स्पर्धेत तीन आठवडे मैदानावर उतरता येणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धवनची दुखापत गंभीर आहे.

रिषभ पंत हा इंग्लंड जात असला तरी तो भारताच्या पहिल्या ११ जणांमध्ये नसेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राखीव खेळाडू म्हणून तो इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. धवनच्या बाबतीत बीसीसीआय कोणताही निर्णय घेण्याची घाई करू इच्छित नाही. त्यामुळे धवनला त्यांनी तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी एका आठवड्याचा वेळ दिला आहे, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. पण, दक्षता म्हणून त्यांनी पंतला स्टँड बाय म्हणून इंग्लंडमध्ये येण्यास सांगितले आहे. संघ व्यवस्थापनाला धवनच्या तंदुरुस्त होण्याची खात्री आहे.

दरम्यान धवनला पर्याय म्हणून कपिल देव यांनी भारताचा संयमी खेळाडू अजिंक्य रहाणेचे नाव सुचवले आहे. ते म्हणाले,”धवनला बदली खेळाडू म्हणून जर रहाणेचं नाव शर्यतीत असेल, तर त्याला प्राधान्य द्यायला हवं. रिषभ पंत आणि अंबाती रायुडू यांच्याऐवजी रहाणेची निवड कधीही योग्य ठरेल. वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. तो सलामीलाही येऊ शकतो आणि मधल्या फळीतही खेळू शकतो.त्यामुळे धवन ऐवजी अजिंक्य राहणेला संधी द्यावी, असे कपिल देव म्हणाले आहेत.