आयपीएल स्पर्धा पुन्हा रद्द होऊ नये म्हणून BCCI ची जोरदार तयारी

ipl

मुंबई :  10 सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी, प्रमुखांसह चार सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करण्यात आला आहे. कसोटी सामना रद्द झाल्यानंतर खेळाडू आता आयपीएलसाठी यूएईमध्ये दाखल झाले आहेत.

आयपीएल 2021 चा दुसरा भाग यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू दुबईला रवाना झाले आहेत. कसोटी सामन्यासाठी इंग्लंडमध्ये असणारे खेळाडू देखील दुबईला रवाना होत आहेत. यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेला कोरोनाचा फटका बसू नये म्हणून बीसीसीआयनं विशेष खबरदारीही घेतली जात आहे.

बीसीसीआयनं सलग दुसऱ्या वर्षी यूएईमील वीपीएस हेल्थकेअरशी करार केला आहे. ही कंपनी आयपीएलच्या दरम्यान कोरोना टेस्ट, तातडीची मेडिकल सेवा यासह आरोग्यासंबंधी सर्व व्यवस्था पाहणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या काळात बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान काम करणाऱ्या नर्स तसंच मेडिकल स्टाफला लीग समाप्त होईपर्यंत खेळाडूंचा मुक्काम असणाऱ्या हॉटेलमध्येच ठेवण्यात येणार आहे. स्पर्धेच्या दरम्यान एकूण 14 बायो बबल तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 8 आयपीएल टीमसाठी, 3 सामना अधिकाऱ्यांसाठी आणि अन्य 3 ब्रॉडकास्टर्स आणि कॉमेंट्रेटरसाठी असतील.आयपीएलसाठी 100 सदस्यांची विशेष टीम तयार केली आहे. ही टीम खेळाडू आणि आयपीएलशी संबंधित सर्वांची मदत करणार आहे. प्रत्येक मॅचच्या दरम्या स्टेडियममध्ये दोन टीम उपलब्ध असणार आहेत. तसेच यावेळी फॅन्सनाही स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे. पण त्यावेळी देखील स्टेडियममधील एकूण क्षमतेच्या 50 टक्के फॅन्सनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या