पुणे: जुगारी पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ अटक

पुणे: ज्यांच्यावर कायद्याच रक्षण करण्याची जबाबदारी आहे. ज्यांनी अनधिकृत धंद्यांना चाप बसवायचा असे पोलीस अधिकारीच अनेक गैरप्रकारात अडकत असल्याच्या घटना वाढल्याचे सध्या दिसत आहे. पुणे पोलिसांनी काल मध्यरात्री पंचतारांकित भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क, मुंढवा भागातून चक्क ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक केली आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक विजय जाधव असे अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर त्यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे.

पोलीस उपायुक्त डॉ प्रवीण मुंडे व त्यांच्या पथकाने काल रात्री मुंढवा परिसरात कपिल मॅट्रिक्स इमारतीमध्ये असणाऱ्या ३ आणि ४ मजल्यावर धडक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी पोलीस निरीक्षक जाधव यांच्यासह क्लब चालक माजी नगरसेवक अविनाश जाधव आणि ४१ जणांना रंगेहात अटक केली. तर जवळपास १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.