बोरगावचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड ; बापू बिरू वाटेगावकर याचं निधन

blank

सांगली: कृष्णा खोऱ्यात गोरगरीबांवर अन्याय करणारे खासगी सावकार, महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांविरोधात पेटून उठून गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बोरगाव (ता. वाळवा) येथील बापू बिरू वाटेगावकर यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

बोरगाव रेठरे हरणाक्ष, मसुचीवडी, ताकारी परिसरात त्यांची दहशत होती. त्यानंतर गरिबांचा कैवारी म्हणून त्यांच्या जीवानावर आधारित बापू बिरु नावाने सिनेमाही प्रदर्शित झाला होता.

कोण होते बापू बिरु वाटेगावकर ? 

बापूंचं गाव वाळवा तालुक्यातील बोरगाव. याच गावातल्या एका गरीब कुटुंबातला बापूंचा जन्म. लहानपणापासून कुस्तीची आवड. गरीब माणसांविषयी विलक्षण कळवळासुद्धा. याच बोरगावात रंगा शिंदे गोरगरिबांना त्रास देत होता. गावातील स्त्रियांची भर रस्त्यात छेड काढत होता. लोक घाबरत आहेत, म्हटल्यावर रंग्या दिवसेंदिवस उर्मट बनत चालला होता. बापू रंग्याच्या दंडेलीला चिडून होते. गावातील पुढाऱ्यांनी बापूला रंग्याचा बंदोबस्त करायला सांगितले. एक दिवस ओव्याच्या कार्यक्रमात बापूंनी रंगा शिंदेला संपवला. रंग्याच्या भावाने रक्ताचा टिळा लावून ‘बापूला खलास करेन’ असा पण केला. बापूंच्या कानावर ही बातमी आल्यावर बापू आणि त्यांच्या साथीदारांनी त्या भावाचाही कायमस्वरूपी बंदोबस्त केला. त्यानंतर त्याच्या मामालाही यमसदनी पाठवले.

गरिबांना न्याय मिळावा यासाठी बापूंच्या हातून तब्बल बारा खून झाले. बापू पंचवीस वर्षे फरार राहिले. पोलिसांनी बापूंच्या घरच्या लोकांना खूप त्रास दिला, छळ केला. बापूंनी पोलिसांच्या स्वाधीन व्हावे, म्हणून खूप प्रयत्न झाले, पण बापू मात्र सह्याद्रीच्या डोंगररांगा, उसाची शेते, दुष्काळी भागातील आडवळणी गावात राहिले..
पंचवीस वर्षे भूमिगत अवस्थेत राहिलेल्या बापूंना पोलिसांनी एक दिवस पकडलं. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेनंतर ते बाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी ठरवलं, लोकांचं प्रबोधन करायचं. मग ते गावोगावी प्रवचनासाठी जाऊ लागले. त्यांचा अाध्यात्मिक अभ्यास होता. भूमिगत असताना त्यांनी एक गुरू केला होता. तेव्हापासून ते अाध्यात्मिक मार्गाला वळले होते. आप्पा प्रवचनकार म्हणून जायचे, तेव्हा त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. प्रवचनात आप्पा ‘चांगलं वागा. कोणावर अन्याय करू नका. बायका-माणसांकडे आई-बहिणीच्या नात्याने वागा’ असं सांगायचे.