कलमाडींच्या राजकीय पुनरागमनासाठी पुण्यात झळकत आहेत बॅनर

सुरेश कलमाडी राजकारणात सक्रीय ?

वेब टीम ; मागे कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या विरोधात पुण्यात फलक लावण्यात आले होते आता पुण्याचे एकेकाळचे कारभारी सुरेश कलमाडी यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्याने पुणे कॉंग्रेस मधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे . कलमाडी राजकारणात सक्रीय झाल्याबद्दल स्वागत करणारा बॅनर पुण्यातील बाजीराव रस्त्यावर लावण्यात आला आहे .
कॉमनवेल्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित व्हावे लागले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती. कलमाडींच्या निलंबनानंतर लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. त्यानंतर पुण्यातील काँग्रेसच्या राजकारणाची सूत्रे पुन्हा कलमाडी यांच्याकडे सोपवण्यात येतील, अशी चर्चाही रंगली होती. सध्या ज्यांच्या कडे कॉंग्रेस पक्षाची धुरा आहे त्या नेत्यांविरोधात मोठ्याप्रमाणावर नाराजीचे वातावरण असल्याचे वारंवार समोर आले आहे .त्यामुळे या नाराज गटाला कलमाडी हेच तारणहार वाटत असल्याने अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली आहे . पुणे शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी तसेच माजी नगरसेवक जयसिंग भोसले यांनी हे शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत .
सदानंद शेट्टी याचं काय म्हणणे आहे ?
हे बॅनर १५ दिवसांपूर्वी लावण्यात आले आहेत . सुरेश कलमाडी हे राजकारणात सक्रीयचं होते. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरूच होत्या तसेच  ते आमचे नेतेच आहेत . त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल मी काहीही बोलणार नाही . विश्वजित कदम यांना विरोध म्हणून हे बॅनर लावण्यात आलेले नाहीत त्याचं देखील काम उत्तम प्रकारे सुरु आहे .