पुण्यात बॅनरवॉर! भाजपचा विकासपुरूष तर राष्ट्रवादीचा कारभारी लयभारी!

पुणे : महारष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचे वाढदिवस एकाच दिवशी येतात. एक म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस. या दोघांचाही वाढदिवस २२ जुलै रोजी असतो. नेत्यांचे वाढदिवसाची उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जास्त असते. मोठे होल्डिंग लावणे, रक्तदान शिबीर आयोजित करणे आणि त्यांच्या वाढदिवसाचा केक कापणे, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आपण पाहतो.

अशीच होल्डिंग बाजी पुण्यात रंगली आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता फडणवीस आणि पवार यांच्या वाढदिवसाचे शहरात होल्डिंग लावण्यात आले. त्यात फडणवीस समर्थकांनी त्यांना ‘विकासपुरुष’ तर पवार समर्थकांनी त्यांना ‘कारभारी लयभारी’ अशा शब्दाने संबोधले आहे. शहराच्या महत्वाच्या ठिकाणी हे होल्डिंग लावण्यात आले आहेत. या होल्डिंची चर्चा शहरात रंगत आहे. राजकीय वर्तुळात देखील या विषयावर चर्चा होत आहे.

तसेच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त आवाहन केले आहे. कोरोना संकटामुळे वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक बांधवांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही कार्यक्रम आयोजित करु नये. भेटीगाठी टाळाव्यात. त्याऐवजी आपली शक्ती कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी, कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी वापरावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

तसेच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते, कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून, टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी कळविले आहे.

होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP