शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम बँकांनी परस्पर वळती करु नये – सुभाष देशमुख

शेतकऱ्यांनी तक्रार करण्याचेही आवाहन

मुंबई : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) मार्फत वर्ग करण्यात येतो. यामध्ये काही बँका या शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होणाऱ्या रकमेतील पैसे कर्जखात्यात परस्पर वळती करतात अशा तक्रारी येत आहेत. बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर वळती करू नये असे स्पष्ट निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले.

बँकानी शेतकऱ्यांच्या लाभाची रक्कम खात्यातून परस्पर वळती केल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ याची तक्रार उपनिबंधक, सहायक निबंधक कार्यालयाकडे करावी, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले.

श्री. देशमुख म्हणाले, बरेचदा असे आढळून आले आहे की कर्जमाफी योजनेंतर्गत खात्यांवर व्याज आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील काही बँका व्याज आकारत आहेत. ही बाब गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या पिकविम्याची किंवा कर्जमाफीची वा अन्य योजनांच्या लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यात येते. मात्र त्या रकमेतून काही बँका परस्पर रक्कम वळती करतात. शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे मिळणारी रक्कम ही शेतकऱ्यांच्या हक्काची असल्याचे त्यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...