सांगलीत ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

सांगली शहरातील विश्रामबाग येथील हॉटेल पै प्रकाश पाठीमागील बाजूस असलेले ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. मात्र सेन्सर वाजल्याने त्या चोरट्यांना हा प्रयत्न फसला. परिणामी तब्बल दहा लाख रूपयांची रोकड बचावली. एटीएम परिसरातील सीसी टिव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून त्यांच्या शोधासाठी विश्रामबाग पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. मिरज शहरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असताना रखवालदाराचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच सांगली शहरातही अशाच पध्दतीने एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने विश्रामबाग पोलिस खडबडून जागे झाले आहेत. विश्रामबाग येथील हॉटेल पै प्रकाश पाठीमागील बाजूस असलेले एटीएम यंत्र फोडण्यासाठी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरटे आले होते. त्यांनी हे एटीएम यंत्र फोडण्याचाही प्रयत्न केला. मात्र अचानकपणे सेन्सर वाजल्याने पकडले जाऊ नये, या भीतीने या चोरट्यांनी पळ काढला. त्यामुळे या एटीएम यंत्रातील दहा लाख रूपये वाचले. ॲक्सिस बँकेच्या अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेमुळेच सेन्सर वाजल्याची माहिती मुंबई येथील मुख्य शाखेत तात्काळ समजली. या शाखेतील कर्मचार्यांनीही वेळ न दवडता विश्रामबाग पोलिसांना याची माहिती दिली. विश्रामबाग पोलिसांनी धाव घेऊन तातडीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी तत्पूर्वीच धूम ठोकली होती. एटीएममधील सीसी टिव्ही चित्रीकरण विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची तपासणी केली असता चेहरे लपवलेले दोन चोरटे आढळले.

You might also like
Comments
Loading...