खजुरोहोची शिल्प आणि ‘कामसूत्र’वर बंदी घाला

वेबटीम: जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असणारे तसेच भारताच्या शिल्पकला आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या खजुराहो मंदिरातील शिल्पांवर मध्य प्रदेशातील बजरंग सेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. खजुराहो मंदिरातील आक्षेपार्ह शिल्पं आणि मंदिराच्या परिसरात कामसूत्र पुस्तक विकण्यावर बंदी घालावी, अशी मागणी बजरंग सेनेने केली आहे. या प्रकरणी बजरंग सेनेकडून छत्तरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘हिंदूस्थान टाईम्स’ने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे.

खजुराहोत असणाऱ्या कामशिल्पांसाठी हे मंदिर जगप्रसिद्ध आहे. खजुराहो मंदिराला युनोस्कोडून जागतिक वास्तूचा दर्जा देखील देण्यात आला आहे. मात्र, बजरंग दलाने हे भारतीय संस्कृतीत बसत नसल्याचे सांगत याला आता विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. पुरातत्त्व खाते आणि पर्यटन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांदेखत मंदिरात कामसूत्र पुस्तकाची विक्री केली जाते. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि परंपरांबद्दल विदेशी पर्यटकांच्या मनात चुकीची प्रतिमा उभी राहत असल्याचा आरोप खजुराहो संघटनेच्या नेत्या ज्योती अग्रवाल यांनी केला आहे.