चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून पत्राद्वारे पंतप्रधानाकडे मागणी

made-in-china

नाशिक : चीनीच्या आयात वस्तूंवर केंद्र सरकारनेच बहिष्कार घालवा याबाबतची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने पंतप्रधानाना पत्राद्वारे केली आहे. भारत देश महासत्तेच्या प्रगती प्रथावर असताना भारतीय बाजारपेठेत चीनने आपले साम्राज्य पसरविले आहे. आज भारतातील जवळपास संपूर्ण बाजारपेठ चीनने काबीज केली असून आपणच त्यांना या बाजारपेठेत मदत करून अप्रत्यक्षपणे भारतीय सीमाक्षेत्रात हस्तक्षेप करण्यास प्रोत्साहन दिल्यासारखे झाले आहे. नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे काम चायना रेल्वे रोलिंग स्टोक कॉर्पेरेशन या चीनच्या कंपनीला दिलेले आहे. सरदार सरोवर येथे उभारण्यात येणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टेच्यु ऑफ युनिटी या पुतळ्यांचे कंत्राटही चायना कंपनीला देण्यात आले होते. मेक इन इंडिया चा नारा देत असताना चीन देशाला प्राधन्य का दिले जात आहे. असा सवाल या पत्राद्वारे पंतप्रधानाना विचारण्यात आला आहे. भारतातील जागतिक निविदा भरण्यासाठी चीनला प्रतिबंध केले जावे. मोबाईल बाजारपेठेत चीनने ७० ते ८० % क्षेत्र काबीज केले असून या देशातील स्मार्टफोन आपल्या देशाच्या हितासाठी फायदेशीर नाही. चीन देशाच्या स्मार्टफोन मधील डाटा सुरक्षित नसल्याचे नुकतेच समोर आले आहे. या स्मार्टफोनमधील लोकेशन अॅप्सचा उपयोग करून चीन देश भारतावर नजर ठेवू शकतो. भारत जगामध्ये सर्वात तरुणांचा देश आहे. यादृष्टीने तरुण वर्गात लॅपटॉप व मोबाईल वापरण्याची संख्या सुद्धा जास्त आहे. परंतु जास्ततर तरुण वर्ग हा कमी किमतीत मिळणारा चीन देशाचा लॅपटॉप व मोबाईल वापरताना दिसत आहे. चीन हा देश तंत्रज्ञानात पुढे गेला असून कमी किमतीत सर्व वस्तू बनवू शकतो तर आपण का नाही याचा विचार करण्याची गरज आहे. चीन मध्ये तयार झालेल्या वस्तू निकृष्ट दर्ज्याच्या असून त्या नाशवंत नसल्याने यातून पर्यावरणास धोका निर्माण होत आहे. चीनी वस्तूंमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू नये याकरिता अमेरिका सारख्या देशाने सुद्धा चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. ज्या वस्तू भारताच्या हिताच्या नाहीत अशा वस्तू आयात करू नये व असले करार त्वरित रद्द करावे. वैश्‍विक महासत्ता म्हणून पुढे वाटचाल करण्यासाठी चीनला नव्हे तर भारतालाच नवी संधी उपलब्ध आहे. भारताला महासत्ता बनविण्याची संधी उपलब्ध झाली असताना चीनी आयात वस्तूंमुळे ती गमवावी लागू नये याकरिता चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालावा व स्वदेशी वस्तू वापरण्याचा प्रचार व प्रसार करण्याची मागणी या पत्राद्वारे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केली.