fbpx

‘मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे पालघरमध्ये प्रचाराला नाही तर हवा पालट करायला आले होते’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या निकालांना अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप युतीला घवघवीत यश मिळणार असून पालघर लोकसभा मतदार संघात देखील युतीलाच जनतेचा कौल मिळणार आहे. असे असतना देखील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी ‘एक्झिट पोल’ आपल्या विरोधात आला तरी मीच जिंकणार, असल्याचा दावा केला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराला नाही तर हवा पालट करायला आले होते, असा टोला जाधव यांनी लगावला आहे. आज जाधव एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी जाधव म्हणाले की, एक्झिट पोल माझ्या विरोधात आला तरी मीच जिंकणार आहे. तर या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराला नाही तर हवा पालट करायला आले होते. तसेच जाधव पुढे म्हणाले की, किटली, चहावाले पंतप्रधान बनू शकतात तर शेतकऱ्यांचा मुलगा खासदार का नाही बनू शकत, अशा शब्दांत जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली.

दरम्यान पालघर लोकसभा मतदारसंघात डहाणू आणि विक्रमगड हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. पालघर शिवसेनेकडे आहे तर बोइसर, नालासोपारा आणि वसई बहुजन विकास आघाडीकडे आहे. या निवडणुकीत युती असलेल्या भाजप शिवसेनेला पालघरची प्रतिष्ठेची जागा मिळते का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.