बालगंधर्वांचे चरित्र हिंदीत प्रकाशित होणार

टीम महाराष्ट्र देशा : संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते नाट्य-पटकथालेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या ‘असा बालगंधर्व’ या कादंबरीच्या ‘बालगंधर्व’ या हिंदी अनुवादित पुस्तकाचे १६ जुलै २०१८ रोजी मंडीहाऊस स्थित रविंद्र भवनात प्रकाशन होणार आहे.

नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून ‘बाळ गंगाधर टिळकांनी’ त्यांना ‘बालगंधर्व’ ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.

दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा पद्मश्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते ‘बालगंधर्व’ या हिंदी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री रामगोपाल बजाज तर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर, ज्येष्ठ अभिनेते व लेखक आणि नॅशनल मिशन फॉर कल्चरल मॅपिंगचे अध्यक्ष दीपक करंजीकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

हिंदीमध्ये राजकमल प्रकाशनतर्फे गोरख थोरात यांनी कादंबरीचा हिंदी अनुवाद केला आहे. हिंदीमध्ये बालगंधर्वांचे समग्र चरित्र प्रथमच प्रकाशित होत असून यामुळे हिंदी भाषकांना बालगंधर्वांची नेमकी ओळख होणार आहे.

अखेर सप्तश्रुंगी गडावरील फ्युनिक्यूलर ट्राॅलीचं लोकार्पण

अंधेरी पूल दुर्घटनेमुळे मुंबईकरांना आज घडणार उपवास; डबेवाले अडकले स्टेशनवरच