बालगंधर्व रंगमंदीर तोडू देणार नाही- दीपक मानकर

पुणे: महापालिकेच्या वतीने ऐतिहासीक बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात यासाठी तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र सध्या यावरून नवीन वादाला सुरुवात झाल्याचं दिसत आहे. रंगकर्मी मंडळींकडून याला विरोध होत आहे तर कोणत्याही परिस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर तोडून देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक दीपक मानकर यांनी दिला आहे.

पुणे शहराच्या कला संस्कृतीची ओळख असणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराच्या धर्तीवर नव्याने सुसज्ज थिएटर, पार्किंग, मनोरंजनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी पुनर्विकास करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. मात्र पुनर्विकास करताना जुनी ऐतिहासिक वास्तू पाडली जाणार असल्याने याला विरोध होत आहे.

आज अंदाजपत्रकावर चर्चेसाठी महापालिकेची खाससभा बोलावण्यात आली होती. यावेळी बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी बालगंधर्व रंगमंचाच्या पुनर्विकासाला पाठींबा दर्शवला. पण हे होत असतांना जुनी वास्तू पाडली जाणार असेल तर आपला विरोध असून त्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.