महापौर बंगला ‘शाबूत’ ; बाळासाहेबांचं स्मारक होणार ‘अंडरग्राऊड’

टीम महाराष्ट्र देशा : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आता महापौर बंगल्याऐवजी बंगल्याच्या तळघरात अर्थात अंडरग्राऊड होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कुठलिही तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व विभागाकडून ‘ब’ दर्जा मिळालेला आहे. त्यामुळेच या वास्तूचे जतन करुन त्याचे पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे.

मुंबईतील महापौर बंगल्याची वास्तू 2300 स्वेअर फूट एवढी असल्याने बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी वास्तूची जागा अपुरी पडते. तर अंडरग्राऊंड परिसर हा तब्बल 9000 स्वेअर फूटांवर पसरलेला आहे. त्यामुळे स्मारकासाठी अंडरग्राऊंड परिसराचा पुरेपूर वापर होईल आणि बंगला परिसरातील लॉन्सही अबाधित राहिल. मुंबई ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीने नुकतीच महापौर बंगल्याला भेट दिली. त्यावेळी समितीकडून या बंगल्याचे आणि पुतळ्यासंदर्भात घेण्यात आलेल्या नवीन निर्णयाचे कौतूक करण्यात आले.