कॉंग्रेस आघाडीचे राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष, बाळासाहेब थोरातांचे सूचक विधान

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे अशा राजकीय परिस्थितीत राज्याचे राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे आमचे लक्ष लागले आहे. अजून कोणालाही पाठींबा देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप – शिवसेनेमधील आरोप प्रत्यारोपांनंतर दुसरीकडे कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे. कॉंग्रेस नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी एक बैठक पार पाडली. ही बैठक आता संपली आहे. या बैठकीनंतर कॉंग्रेस नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीला बाळासाहेब थोरात , माणिकराव ठाकरे , अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण , सुशीलकुमार शिंदे आदि नेते उपस्थित होते.

यावेळी कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजप पक्षाला बहुमत असूनही सरकार स्थापन करता आलेले नाही. त्यामुळे सरकार स्थापनेत भाजप अपयशी ठरले आहे. भाजपच्या निष्क्रिय कारभारामुळेचं भाजपला जनतेने झिडकारले आहे. ५ वर्षात भाजपने हाती घेतलेले एकही विकास काम पूर्ण केलेले नाही. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही. त्यामुळे जनतेने त्यांना सत्तेपासून दूर ठेवले आहे, असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान या सर्व सत्ता संघर्षामध्ये राज्यात सत्ता कोणाची येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने भाजप व्यतिरिक्त सत्ते स्थापनेसाठी आम्हाला इतर पर्याय उपलब्ध आहेत, असा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा पाठींबा घेऊन सत्ता स्थापन करणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या