बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा

blank

टीम महाराष्ट्र देशा: औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत ११५ वॉर्डांमधून स्वबळावरच लढण्याची तयारी करा, असे आदेश राज्याचे महसुलमंत्री तथा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

येत्या एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादीसोबत न जाता स्वबळावर लढा अशी मागणी घेऊन मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांना सध्यातरी सगळ्या जागा स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने तयारीला लागा अशा सूचना थोरातांनी केल्या आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक गांधी भवनात पार पडली होती. या बैठकीत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या ‘शिवसेने’सोबत न जाता स्वबळावर लढण्याची मागणी बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली होती. हीच मागणी घेऊन आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सोबत जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली.