fbpx

देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची खात्री वाटत नाही : थोरात

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नाट्य रंगताना दिसत आहे. एकीकडे भाजप सेना युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस आघाडी भाजप युतीला शह देण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. याबाबत कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच चिमटे घेतले आहेत. पुन्हा मुख्यमंत्री होण्याची खात्री वाटत नसल्याने ‘पुन्हा मीच येणार’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगावे लागत असल्याची, जळजळीत टीका थोरात यांनी केली आहे. मुंबई येथे पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते.

यावेळी थोरात म्हणाले की, शेतकरी, कामगार, मोबलिंचिंगची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी.आम्ही पाच वर्षे शेतकरी, कामगार यात्रा राज्यभर काढल्या आहेत. मात्र सरकारला फक्त निवडणुकीच्या तोंडावर यात्रा काढत आहे. तसेच कॉंग्रेस आता ‘महा जन यात्रा’ काढणार आहे. पुढे थोरात म्हणाले की, आघाडीत येण्यासाठी आम्ही सर्वच पक्षांना आमंत्रित करत आहोत. वंचित आघाडीशी चर्चा सुरू आहे. मात्र मनसेला आघाडीत घेण्याचा प्रस्ताव आलेला नाही.

दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता आणि राज्यात भाजप-सेना युतीची मोर्चेबांधणी पाहता विधानसभेला युतीला बहुमत मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजप सेनेची सत्ता तर येणार आहे. पण मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. तर भाजप-सेनेच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे.