काँग्रेस पक्ष सध्या संकटात असला तरी केंद्रात पुन्हा सोनियाचेच दिवस येणार आहेत – थोरात

balasaheb thorat

सातारा – सातारा, वडूजची ही भूमी क्रांतीची भूमी आहे, साताऱ्याची भूमी देशातील क्रांतीकारकांची केंद्रबिंदू होती, या भूमीने देशाला ऊर्जा दिली आहे. १८५७ च्या उठावावेळीच या भूमीत स्वराज्याची मशाल पेटली होती. या भूमीतून क्रांतीकारक जन्माला आले. सरकार कसे असावे हे क्रांतीसिंह नाना पाटील यांनी दाखवून दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी देशाला संविधान देऊन सामान्य लोकांना ताकद दिली पण आता संविधान अबाधित राहिल का, लोकशाही अबाधित राहिल का याची शंका वाटते असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने सुरु असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’, अभियान काल सातारा जिल्ह्यातील वडूज येथे संपन्न झाले. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

२०१४ पासून देशातील चित्र बदलले आहे. दहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे, त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले, गोळीबार केला, शेतकरी रक्तबंबाळ झाले पण दिल्लीतील सरकार सुस्त पडून आहे शेतकऱ्यांची दखल ते सरकार घेत नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांवर जुलुम करत असताना महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला. सत्तेसाठी काहीही करायचे हे भाजपाचे तंत्र आहे परंतु हा देश राज्यघटनेच्या तत्वानुसारच चालेल. काँग्रेस पक्ष सध्या संकटात असला तरी केंद्रात पुन्हा सोनियाचेच दिवस येणार आहेत अशी ग्वाही थोरात यांनी दिली.

दरम्यान, केंद्रातील भाजपा सरकार आपली राष्ट्रीय संपत्ती दोन चार उद्योगदपती मित्रांच्या घशात घालत आहे. देशातील रस्ते, रेल्वे स्टेशन, रेल्वेमार्ग, ऊर्जा विभाग, गॅस पाईपलाईन, टेलिकॉम सेक्टर, गोडाऊन, खाणी, विमानतळे, बंदरे अशी पायाभूत क्षेत्रे उद्योगपतींना ६ लाख कोटी रुपयांसाठी ४० वर्ष लीजवर दिली आहेत. देशाची संपत्ती खाजगी लोकांना विकण्याचा सपाटाच लावला आहे. याला काँग्रेसचा विरोध असून देशाची संपत्ती लुटणाऱ्यांविरोधात उभे राहून देशाची संपत्ती विकू देणार नाही. देशाच्या संपत्तीचे मालक नागरिक आहेत, या संपत्तीचे जतन करु आणि देशाची संपत्ती लुटारुंपासून वाचवण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल, असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या