‘मुख्यमंत्री केवळ पक्षाचा नाही तर जनतेचाही असतो हे सेना भाजपने लक्षात ठेवावे’

टीम महाराष्ट्र देशा :  शेतकरी आत्महत्या प्रश्नावरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजप – सेनेवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री फक्त पक्षाचा नव्हे तर जनतेचा असतो हे भाजप -सेनेने लक्षात ठेवावे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करत आहेत. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

याचदरम्यान सेना भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरून कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सेना भाजपवर निशाणा साधला. भाजप सेना दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहेत. महाराष्ट्रात आज शेतकरी आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालेली नाही. पेरणीसाठी बियाणं उपलब्ध नाही. ही जबाबदारी कोणाची? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला.

इतकेच नव्हे तर राज्याचा मुख्यमंत्री हा फक्त पक्षाचा नसतो तर तो जनतेचा देखील मुख्यमंत्री असतो, हे सेना भाजपने लक्षात ठेवावे, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले आहे.