प्रत्येक जिल्ह्यातील उद्यानात साकार होणार बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक!

प्रत्येक जिल्ह्यातील उद्यानात साकार होणार बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक!

औरंगाबादः नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील उद्यानात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारून त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, ओपन जिम, कला दालन आदींची व्यवस्था करा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी खर्च करा, अशा सूचना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मराठवाड्यातील २०१८ ते २०२१ या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनांतर्गत कोरोनाचा निधी व खर्च याबाबतची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत पुढील वर्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष साजरे होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराजांच्या नावे अध्ययन केंद्रे सुरू करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला आढावा बैठकीत केल्या आहेत.
तसेच राज्यात मानव विकासाच्या माध्यमातून मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी अनेक कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी ४०० कोटींचा निधी दिला आहे. मराठवाड्यातच औरंगाबादमध्ये राज्याचे कार्यालय असून मराठवाड्यासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत, अशी माहितीही क्षीरसागर यांनी दिली.

नावीन्यपूर्ण योजनेतून योजना राबवताना काही त्रुटी आढळल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी अशा योजना राबवून रोजगाराच्या संधी निर्माण करा. नागरिकांच्या आरोग्यासह जिल्ह्याच्या उत्पन्नवाढीचा प्रयत्न योजनेतून होणे गरजेचे आहे. मानव विकास निर्देशांक वाढीच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याने स्थानिक गरजेनुसार नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत कामांचा समावेश करावा. मात्र, यात नियमांचे पालन होत नसल्याचे काही प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी निधी खर्च करताना नियमांचे पालन करावे, अशा सूचनाही क्षीरसागर यांनी दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या