fbpx

राज ठाकरेंमध्ये दिसतोय बाळासाहेबांचा दरारा, उद्या लागणार मुंबई पोलिसांचा कस

अनिकेत निंबाळकर : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तरी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आदेश दिले आहेत. तरीही उद्या मनसे कार्यकर्ते रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी ठराविक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. तर खबरदारी घेतली आहे.

राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या दराऱ्यामुळे अनेकांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा काळ आठवला आहे. तर राज ठाकरे हे दुसरे बाळासाहेब असल्याचं बोलले जात आहे. बाळासाहेब ठाकरेंना अटक करते वेळी ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली होती. तर शिवसैनिकांनी संपूर्ण महाराष्ट्रात बंद पुकारला होता.

फेब्रुवारी १९६८ च्या ‘मार्मिक’मध्ये बाळासाहेबांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर जळजळीत अग्रलेख लिहिला आणि त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये ते बेळगावला गेले. परत आल्यावर त्यांनी इशारा दिला, ‘निश्चित कालमर्यादेत केंद्राने सीमाप्रश्न सोडवला नाही तर केंद्रीय मंत्र्यांना, काँग्रेस पुढाऱ्यांना मुंबईत प्रवेश नाही’. त्यातून आधी यशवंतराव चव्हाणांची आणि नंतर १९६९ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाई यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. मोरारजींनी आंदोलकांवरून गाडी पुढे दामटण्यास चालकाला सांगितलं. त्यातून आंदोलन सुरू झालं व मुंबई पेटली. पोलिसांच्या गोळीबारात तब्बल ५२ माणसं मृत्युमुखी पडली. आंदोलन दडपण्यासाठी बाळासाहेबांना अटक झाली. ही त्यांच्या आयुष्यातील पहिली अटक. यातूनच शिवसेना स्टाईल ‘मुंबई बंद’ सुरू झाला.

दरम्यान बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांचे ज्या प्रमाणे प्रेम होतं तसचं किंबहुना त्याहून ही काकणभर प्रेम हे महाराष्ट्र सैनिकांचे राज ठाकरेंवर असल्याचं दिसत आहे. राज ठाकरे यांच्या चौकशी वरून प्रवीण चौगुले या मनसे कार्यकर्त्याने व्यथित होऊन आत्महत्या केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी सुन्न होत. मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. ‘आपला सहकारी प्रवीण चौगुले ह्याच्या निधनाच्या बातमीने माझं मन व्यथित झालं आहे. मला ईडीची नोटीस आली, ह्या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होतं. प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी इच्छा. प्रवीणचं जसं माझ्यावर, पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे ह्याची मला जाणीव आहे. पण माझी तुम्हा सर्वाना कळकळीची विनंती आहे की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका’, अस आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.