आठवण लोकमान्यांची…

lokmanya tilak 1

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!’ या सिंहगर्जनेला गतवर्षी १०० वर्ष पूर्ण झाली. पण लोकमान्य टिळकांची स्मृतीही कुणाला झाली नाही. खरं तर त्यांच्या सिंह गर्जनेपलिकडे किंवा फार तर शेंगांच्या टरफला पलीकडे लोकमान्य टिळक मराठी माणसालाही कितपत माहीत आहेत याची शंकाच आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना तर ‘बाळ गंगाधर टिळक वॉज अ मॉडरेस्ट’ या एका तुटपुंज्या ओळीच्या पलीकडे टिळकांचा इतिहासच शिकवला जात नाही. नेते मंडळी तर काय फक्त राजकारणासाठी व्यक्तींचा वापर करत असतात. फक्त एकच विचाराचा, एकाच व्यक्तीचा उदोउदो व्हावा म्हणून टिळकांना ‘लोकमान्य’ म्हणायलाही काही नेते तयार नसतात. टिळक पुण्यतिथीला त्यांच्या गिरगाव चौपाटीवरील स्मृतिस्थळाला साधा एक पुष्पहारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्पण केला जात नाही, हे केवढं दुर्दैव! अर्थात लोकमान्यत्व हे नेत्यांच्या ठरवण्यावरून नाही तर बहुतांशी लोकांच्या श्रद्धेवरून ठरत असतं.
आजकाल लोकमान्य टिळक टर्मिनसच्या पलीकडे टिळक या नावाचं अस्तित्वही पाहायला मिळत नाही. ‘दे दी आझादी बिना खड्ग बिना ढाल’ असं म्हणताना काही तथाकथित लोकनेत्यांची जिभही कचरत नाही. आणि तेच संस्कार पाठ्यपुस्तकातून मुलांच्या मनावर बिंबवले जात आहेत.
‘स्वराज्य’ हा शब्द जसा लोकमान्य टिळकांनी रूढ केला, तसाच ‘बहिष्कार’ (जो महात्मा गांधीजींनी पुढे शस्त्र म्हणून वापरला) हा शब्दही टिळकांनीच सामान्यांना शिकवला. फक्त शिकवलाच नाही, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यात विदेशी मालाची होळी केली तेव्हाही त्या होळीसमोर भाषण करण्यात टिळक अग्रेसर होते. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ असं टिळकांनी कधीच केलं नाही. उलट क्रांतीच्या मार्गाने जायचा संदेश क्रांतीकारकांना देतानाही टिळकांनी त्यातली जहालता, त्यामुळे होणारा परिणाम, ओढवणारी आपत्ती यांची वारंवार सूचना केली. तरीही या मार्गाचा अवलंब करून पुढे झळकलेले हिरे म्हणजे अर्थातच चापेकर बंधू, बाबाराव सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट. टिळक हे फक्त पेशानेच शिक्षक नव्हते, तर स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा गुरुमंत्र त्यांनी शिकवला.
लोकमान्य टिळकांचं स्वातंत्र्यातील योगदान म्हणाल, तर शक्य त्या सर्व मार्गांनी त्यांनी देशाच्या जडणघडणीत घेतलेला सहभाग. मग ती राजकीय सुधारणा असो वा सामाजिक. फक्त इंग्रजांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सुधारणा लोकांच्या बोकांडी बसवणं त्यांना अमान्य होतं. ज्या काळात मुलगी ८ वर्षाच्या आत सासरी धाडायची असा लोकचार होता; त्या काळात कोणत्याही निर्बंधाचा (कायद्याचा) आधार न घेता, पुण्यातल्या सनातनी लोकांना न जुमानता स्वतःच्या मुलीचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षी करणारे टिळकंच!
टिळक तरतरीत, उग्र होते, मानी होते. पैशांसाठी, पदासाठी स्वाभिमान धाब्यावर बसवणे टिळकांसारख्या सिंहाला कधीच पटणारं नव्हतं. ‘इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा प्रश्न जो राज्यकर्त्यांना विचारू शकतो त्याची अफाट शक्ती, मनाची तयारी आणि येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची छाती या गोष्टी किती उच्च पातळीवरील होत्या हेच सिद्ध होतं. फक्त अर्ज-विनंत्या करून स्वराज्य मिळत नाही, तर त्यासाठी शक्य ते सर्व करण्याची तयारी त्यांनी दर्शवली; प्रसंगी तुरुंगवासही पत्करला. काळानुसार काही पद्धती, जुने मार्ग बदलावे लागतात याचंच हे द्योतक नाही का? ‘गांधी आमचे, सावरकर तुमचे’ असं म्हणताना काँग्रेसच्या तथाकथित राजपुत्राला लोकमान्यांचं स्मरण झालेलं कधीच दिसलं नाही. टिळक काँग्रेसमध्ये होते हे तरी या राजपुत्राला माहित असेल की नाही शंकाच आहे. असो.
पूर्वी जेव्हा सुरत काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा जहाल आणि मवाळ हे पक्ष भिन्न झाले आणि लोकांनी मावाळांपेक्षाही जहाल काँग्रेसला डोक्यावर घेतली. लोकमान्य विद्यमान असेपर्यंत काँग्रेस पूर्णपणे आपल्याकडे ठेवणं महात्मा गांधींना कधीही शक्य झालं नाही. टिळकांचा लोकांमधील दरारा आणि मनाचं इतका होता की, ‘टिळक महाराज’ जे म्हणतील ते ते सर्व करण्याची लोकांची तयारी असायची – निदान महाराष्ट्रात तरी! महाराष्ट्रात टिळकांना शह देणं केवळ अशक्य होतं. त्यामुळे ज्या दिवशी टिळकांनी मुंबईत शेवटचा श्वास घेतला त्याच दिवशी मोहनदास गांधी नामक व्यक्तीने मुंबईतच सभा बोलावून आपल्या महात्मा पर्वाला प्रारंभ केला.
२३ जुलै १८५६ ला जन्मलेल्या या कर्मयोग्याचा १ ऑगस्ट १९२० ला न्यूमोनियाने बाळी घेतला. माणूस संपला तरी विचार संपत नाहीत…आणि टिळकांसारख्या असामान्य साधुपुरुषाचे विचार कधीच संपणार नाहीत. आवश्यकता आहे ती ता विचारांना नवा उजाळा देण्याची !

(महाराष्ट्र देशा लेखकाच्या मताशी सहमत असेलच असे नाही)

– आकाश भडसावळे
भ्र. 8275442370