‘बजरंग सोनावणेसह शेकडो मराठा मुलांना गोपीनाथ मुंडे साहेबांनी नेता केलं’

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला भाजपकडून न्याय मिळत नसल्याची ओरड करणाऱ्या नेत्यांनी बजरंग सोनवणे सह मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांना गोपीनाथ मुंडे यांनीच ‘नेता’ केले, तर त्यांचा खंबीरपणे वारसा चालवणाऱ्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीने लाथाडलेल्या अनेक नेत्यांचे ‘राजकीय पुनर्वसन’ केले हे विसरू नका. असे होळ जिल्हा परिषद गटाच्या सदस्या डॉक्टर योगिनी थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

योगिनी थोरात यांनी पत्रकात पुढे म्हटले की, विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करण्याऐवजी विरोधक जातीचा मुद्दा पुढे करत लोकसभा निवडणूक लढवत आहेत. जनतेने अशा जातीयवादी नेत्यांवर विश्वास न ठेवता विकासाचे राजकारण करणाऱ्या प्रीतम मुंडे यांना साथ द्यावी असे आवाहन केले आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मराठा समाजाला नेहमीच न्याय दिला त्यांनी मराठा समाजातील शेकडो कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना नेता केले म्हणूनच मुलांना आमदार खासदार तयार करणारा ‘कारखाना’ असे संबोधले जात होते.

मराठा समाजाला खंबीरपणे साथ देऊन अनेक नेतृत्व घडवले मात्र मुंडे यांनी ज्यांना नेता केले अशांनी त्यांची साथ सोडली अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तेथे त्यांचे नेतृत्व बळकट करण्याऐवजी त्यांना संपवण्याचे कट रचले गेले. मात्र अशा संपलेल्या आणि संपण्याच्या वाटेवर असलेल्या अनेक नेत्यांचे पंकजा मुंडे यांनी ‘राजकीय पुनर्वसन’ केले. या सर्व बाबी जनतेला ठाऊक आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही जातीचा मुद्दा पुढे केला तरी जनता गोपीनाथ मुंडे यांना यांना स्मरून पंकजा मुंडे सारख्या विकासाचे राजकारण करणाऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रीतम मुंडे यांना साथ देईल असा विश्वास योगिनी थोरात यांनी व्यक्त केला आहे.