बैलगाडा शर्यतीवरून कोल्हेंचा आढळरावांवर निशाणा, बैलगाडा संघटनेचा मात्र आढळरावांना पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा: शिरूर लोकसभा मतदारसंघात बैलगाडा शर्यतीवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. इतर विकासाच्या प्रश्नांसह बैलगाडा शर्यत सर्वच उमेदवारांच्या अजेंड्यावर आहे. एका बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हेंकडून विद्यमान खासदार आढळराव पाटील यांनी शर्यती पुन्हा सुरु होण्यासाठी काय प्रयत्न केले, असा सवाल केला जात आहे. तर दुसरीकडे खेड तालुका बैलगाडा मालक संघटनेने आढळराव पाटील यांना पाठींबा दिला आहे.

खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली, गाडा मालकांना सोबत घेत अनेक आंदोलने केली, आंदोलनामध्ये अनेक केसेस त्यांच्यावर झाल्या, आगामी काळात देखील आढळराव हेच बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याचे काम करतील, असा विश्वास यावेळी बैलगाडा मालक संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे आ सुरेश गोरे यांच्यासमवेत बैठकीत आढळराव यांना पाठींबा देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

यावेळी बोलताना आ गोरे म्हणाले की, आघाडी सरकारनेच बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली, शर्यत पुन्हा सुरु होण्यासाठी खा आढळराव पाटील यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकही नेत्याने आंदोलनात सहभाग घेतला नाही.