प्रकाश आंबेडकर मर्यादित, तर आठवले संधीसाधू !

नागपूर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे संधीसाधू असून काँग्रेस,भाजप व शिवसेनेच्या भरवशावर सत्तेचे सुख घेतात. तर प्रकाश आंबेडकर हे एका जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याची घणाघाती टीका बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी नागपुरात केली. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर आयोजित पहिल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी साखरे यांनी दलित नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले़.

रामदास आठवले हे भाजपाच्या गोटात असून भाजपच्या सांगण्यानुसार ते वागतात़ दलित बांधवांची दिशाभूल करण्याचे काम राज्यातील दलित नेते करीत आहे़त. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यात झालेल्या हिंसाचाराची आम्ही निंदा करतो. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांचे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी रक्ताचे नाते आहे़ त्यांनी मनावर घेतले असते तर जनतेने त्यांना डोक्यावर घेतले असते़ मात्र, दुर्दैवाने ते एका जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याचा टोला साखरे यांनी लगावला.

यावेळी भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, भाजप इव्हीएममध्ये घोळ करून निवडणूक जिंकत आहे. विरोधी पक्षात असताना सुब्रमण्यम स्वामी आणि किरीट सोमय्या सारखे नेते इव्हीएमवर आक्षेप घेत होते. तेच लोक आता इव्हीएम चांगले असल्याचे प्रमाणपत्र वाटत सुटल्याचे साखरे म्हणाले.भाजपाला मिळालेला विजय हा इव्हीएम मशीनमुळे मिळालेला आहे़जेथे जेथे बॅलेट पेपरचा वापर झाला, तेथे भाजपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले़ कधीकाळी भाजपाचे लोक इव्हीएम विरोधात बोलत होते़ सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात धाव घेतली होती़ तर मुंबईतील भाजपाने नेते खा़ किरीट सोमय्या हे रस्त्यावर इव्हीएमविरोधात संघर्ष करीत होते़ त्याच इव्हीएममुळे निवडणुका जिंकता येतात हे लक्षात आल्यामुळे भाजपाचे नेते आता इव्हीएमचे समर्थन करीत असल्याचे साखरे यांनी नमूद केले़.

यावेळी सागर डबरासे,संदीप ताजने, उत्तम शेवडे, कृष्णा बेले आदी उपस्थित होते़ काँग्रेस, भाजपाला आव्हान देऊ काँग्रेस आणि भाजपाची धोरणे सारखीच असून हे दोन्ही पक्षा चाचा-भतीजासारखे वागतात, अशी टीका साखरे यांनी केली़ ते म्हणाले, राज्यात बसपाची बांधणी केली जात असून येत्या निवडणुकीत सशक्त पर्याय जनतेला दिला जाईल़ वेगळ्या विदर्भाबाबत भाजपाने आश्वासन दिले होते़ नरेंद्र मोदी यांनी युवकांना रोजगार देण्याचे, शेतमालाला अधिक भाव देण्याचे आश्वासन दिले होते़ ते हवेत विरले़ देशातील बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे़ आजवर काँग्रेसनेही तेच केले़ त्यामुळे येत्या निवडणुकीत या दोन्ही पक्षाला आव्हान देण्याचे काम बसपा करेल असेही त्यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...