fbpx

संभाजी भिडे यांचा मनुवादी चेहरा उघड – विवेक कांबळे

bhide guruji 22

सांगली: श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या जातीविरोधी वक्तव्यातून लोकशाहीचाच खून होत आहे. त्यातून संभाजी भिडे यांचा खराखुरा मनुवादी चेहरा आता सर्वांसमोर आला आहे, अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा सांगली महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांनी केली.

या मनुवादी प्रवृत्तीविरोधात सोमवार ८ जानेवारी रोजी कोणत्याही परिस्थितीत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणारच, असा निर्धारही त्यांनी केला आहे. संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, या मागणीसाठी रिपाईच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
तणावपूर्ण परिस्थिती असल्याने हा मोर्चा काढू नये, अशी विनंती जिल्हा प्रशासनाने केली आहे. मात्र मनुवादी प्रवृत्तीविरोधातील हा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. सोमवारी मोर्चा काढला जाणार असून त्यात लोकशाही मानणार्या व मनुवादी विचाराला विरोध करणा-यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेने दलितांसह तब्बल ५९ विविध जातींना ‘ॲट्रॉसिटी’नुसार न्याय हक्काचा अधिकार दिला आहे. असे असताना संभाजी भिडे यांनी थेट या कायद्यावरच टीका केली आहे. जाती- जातीत भांडणे लावून चातुर्वर्णीय व्यवस्थेचा पुरस्कार करीत त्यांना मनुवादी राज्य आणायचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी ‘भीमा- कोरेगाव’निमित्ताने जाती- धर्मात भांडणे लावणा-या या प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ‘भीमा- कोरेगाव’च नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात गत चार- पाच दिवसात घडलेल्या सर्व घटना निंदनीय आहेत. मात्र या घटनांची सखोल चौकशी केली असता संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे हे निश्चितपणे दोषी असल्याचे दिसून येईल. यापूर्वीही या दोघांवर दंगल भडकविण्याचे अनेक आरोप झाले आहेत. तशा पध्दतीचे अनेक गुन्हेही या दोघांवर दाखल आहेत. अशा परिस्थितीत संभाजी भिडे जनतेची दिशाभूल करण्यासाठीच ‘ॲट्रॉसिटी’सारख्या घटनात्मक अधिकाराला जाणीवपूर्वक नावे ठेवून या संपूर्ण प्रकरणालाच वेगळे वळण देण्याचा उपदव्याप करीत आहेत.

सध्याच्या कठीण परिस्थितीत प्रत्येकालाच आपल्या दोनवेळच्या पोटाची भ्रांत आहे. दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याबाबत संभाजी भिडे कधीच काही बोलत नाहीत. याउलट ४००- ५०० वर्षापूर्वीच्या इतिहासात मोडतोड करून सोयीस्कररित्या गैरअर्थ काढून बहुजन समाजातील युवकांची डोकी भडकवित आहेत. बहुजन समाजातील युवकांना शैक्षणिक क्षेत्र व पुरोगामित्वापासून दूर करण्याचा एकप्रकारे विडाच संभाजी भिडे यांनी उचलला आहे. अशा मनुवादी व स्वयंघोषित ‘गुरूजी’पासून बहुजन समाजातील युवकांनी वेळीच साधव व्हावे, असे आवाहनही विवेक कांबळे यांनी केले.

2 Comments

Click here to post a comment