बाहुबली, बालाजी मंदीराचा गणेश सजावटीत समावेश

औरंगाबाद : घरगुती गणपतीची सजावट करण्यासाठी थर्माकोलला मोठी मागणी असते. थर्माकोलचा व्यवसाय करणारे दरवर्षी पाच टक्के कर भरत होते. मात्र, यंदा थर्माकोलवर २८ टक्के जीएसटी भरावा लागत असल्याने दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती सजावटीसाठी उपलब्ध असणा-या थर्माकोल मंदिराचे दर चारशे ते चार हजारापर्यंत झाले आहेत.गणपती अवघ्या आठदिवसांवर येऊन ठेपल्याने थर्माकोलच्या मंदिरांनी बाजारपेठ सजली आहे. कारागीर गेल्या महिन्यापासून गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य तसेच थर्माकोलची विविध आकारातील मंदिरे तयार करत आहेत. गेल्या महिन्यापासून मंदिरे बनवण्याच्या कामात कारागीर मग्‍न आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार मंदिरे तयार केली जातात. गजानन मंदिर, कॅनॉट प्‍लेस, सेव्हन हिल, टीव्ही सेंटर, गुलमंडी, येथे विविध प्रकारची मंदिरे विक्रीसाठी ठेवलेली आहेत.मागील वर्षी मंदिरांची किंमत दोनशेपासून ते तीन हजारांपर्यंत होती. मात्र, यंदा जीएसटीमुळे दरात वाढ झालेली आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार यंदा बाहुबली, बालाजी आदी स्वरूपात मंदिरे तयार करण्यात आली आहेत. वॉटर फाउंटन्स थर्माकोलला अधिक मागणी आहे.