‘माधुरीला उमेदवारी द्यावी इतके वाईट दिवस भाजपवर आले नाहीत : संजय काकडे

पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात राज्यातील पुणे लोकसभा मतदारसंघ चांगलच चर्चेत आला आहे. आधी शरद पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. मात्र शरद पवार यांनी त्यातून हवा काढून घेतल्यानंतर या चर्चांना पूर्ण विराम मिळाला.

मात्र, भाजपकडून आता नवी खेळी खेळत आपले ‘ट्रम्प कार्ड’ बाहेर काढल्याची चर्चा आहे. आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजप सेलिब्रिटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपने देशव्यापी सर्वेक्षण सुद्धा केले आहे. या सर्वेक्षणानुसार बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र ‘मिड डे’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे.

माधुरी दीक्षितसाठी पुण्यातील ज्या जागेचा विचार केला जात आहे, त्या जागेचं लोकसभेतील प्रतिनिधीत्व सध्या भाजपचे खासदार अनिल शिरोळे करत आहेत. माधुरीला याच मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास अनिल शिरोळे यांच्या खासदारकीची विकेट पडणार हे निश्चित मानले जात आहे. त्याचवेळी या जागेसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे माधुरीचं नाव निश्चित झाल्यास, इथे नाराजी निर्माण होण्याची शक्यताही आहे.

राज्यसभेतील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी माधुरीला उमेदवारी देण्यासंदर्भात सुरु झालेल्या चर्चांवर भाष्य केलं . ‘महाराष्ट्र देशा’ बरोबर बोलताना काकडे यांनी माधुरीच्या उमेदवारीची शक्यता फेटाळून लावली. भाजपला विजय मिळविण्यासाठी माधुरी दीक्षितला उमेदवारी द्यावी लागेल एवढे वाईट दिवस पक्षाला आलेले नाहीत असं काकडे यांनी म्हटलं आहे. ज्या पक्षाचे १०० च्या आसपास नगरसेवक,८ आमदार, खासदार ज्या शहरातून आहेत तिथे अश्या परिस्थितीत बाहेरून उमेदवार आयात करून भाजप उमेदवारी देईल अशी शक्यता वाटत नाही. ज्याचं पक्षासाठी आणि पक्ष वाढीसाठी मोठं योगदान आहे अश्या स्थानिक नेत्यालाच उमेदवारी पक्ष देईल असं देखील ते म्हणाले.

‘मिड डे’च्या वृत्तानुसार, 2019 साली भाजपकडून माधुरी दीक्षितला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. माधुरीसाठी मुंबई आणि पुण्यातील मतदारसंघांची चाचपणी झाली. त्यात पुण्यातून माधुरीला लोकसभेसाठी उतरवलं जाण्याची शक्यता अधिक आहे. भाजपचे कट्टर कार्यकर्ते, काहीशे तटस्थ आणि भाजपविरोधक अशा मतदारांकडून भाजपने या सर्वेक्षणाअंतर्गत मतं जाणून घेतली आहेत.

पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; संजय काकडेंच्या गर्जनेनंतर शिरोळेंचा सावध पवित्रा