शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज; बच्चू कडू घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

bachhu kadu

अमरावती : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती.

मात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच, येत्या दोन महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह स्थानिक प्रशासनाने अधिक काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. त्यामुळे वाढत्या धोक्यात शाळा सुरु होणार का असा प्रश्न पुन्हा निर्माण झाल्याने संभ्रम वाढत आहे.

मुंबईमध्ये ३१ डिसेंबरनंतर, पुण्यात १३ डिसेंबरनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३० नोव्हेंबरनंतरच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे तेथील प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर उर्वरित महाराष्ट्राबाबत शाळा सुरु करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाने घ्यावा असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते.

शाळा सुरु करण्यासाठी २३ नोव्हेंबर म्हणजेच उद्याची तारीख राज्य सरकारने जाहीर केली होती. अशातच आता शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती बदलली आहे, असे म्हणत शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मांडले आहे. शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोलणार असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या