संतापलेल्या बच्चू कडूंनी लगावली सुपरवायझरच्या कानशिलात

bacchu kadu new

टीम महाराष्ट्र देशा- रस्त्यावरील चिखलामुळे एक विद्यार्थी घसरून पडल्याच्या घटनेनंतर आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी परतवाडा-मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील सुपरवायझरच्या कानशिलात लगावली असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांची सुरक्षा व नियम धाब्यावर बसवून या बांधकामात पिवळ्या मातीचा वापर केला जात असल्याचा आरोप कडू यांनी केला आहे. तसेच २४ तासात रस्त्याच्या बांधकामात पाण्याचा योग्य वापर न केल्यास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याच्या कानशिलेत हाणणार असल्याचा इशारा दिला

चांदूरबाजार जवळ राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरु आहे.या रस्त्याचा कंत्राट एच.जी. इन्फ्रा कंपनीने घेतला आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी या मार्गावर चिखल झाला आहे. गुरुवारी सकाळी आ. बच्चू कडू कुरळपूर्णा येथून चांदूर बाजार येथे परत येत असताना हैदतपूर वडाळा या गावाजवळ रस्त्यावरील चिखलामुळे एक विद्यार्थी घसरून पडला. रस्त्यावर पाणी टाकल्याने सर्वत्र पिवळी माती उडत होती. संतापलेल्या आमदार बच्चू कडू यांनी तेथे उपस्थित असलेल्या सुपरवायझरला विचारणा केली. मात्र सुपरवायझरतर्फे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतापलेल्या आ. बच्चू कडू यांनी त्याच्या कानशिलात हाणल्या.