मुख्यमंत्री, अर्थमंत्री पैसे देत नाहीत, मी काय करू?-बबनराव लोणीकर

टीम महाराष्ट्र देशा- पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या वादग्रस्त विधानाचा वाद संपत नाही तोपर्यंत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री विकासकामांसाठी पैसे देत नाहीत. आता मी तरी काय करू, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपली हतबलता बोलून दाखवली आहे. शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी बोलताना त्यांनी आपली व्यथा मांडली. दोघांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.

शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कन्नड तालुक्यातील चार गावांच्या पाणीपुरवठा योजनांना निधी मिळण्याच्या मागणीसाठी गुरुवारी औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावर लोणीकर यांना घेराव घातला. तालुक्यातील पाणीपुरवठा योजना चार वर्षापासून रखडल्या आहेत. कामे कधी सुरू करणार, अशी विचारणा केली. त्यावर कर्जमाफीमुळे कामे होण्यास उशीर होत आहे, अशी बतावणी लोणीकर यांनी केली. मात्र, चार वर्षांपासून कर्जमाफी सुरू आहे काय? असा प्रतिप्रश्न लोणीकर यांना करण्यात आला. त्यावेळी लोणीकर यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पैसे देत नाहीत. विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातील कामंही झालेली नाहीत. मग मी तरी काय करू शकतो?, असे लोणीकर यांनी म्हटले.