‘कोरोना काळात सर्वाधिक मदत महाराष्ट्राला, तरी वसुली सरकार सर्व बाबतीत नापास’

uddhav

परतूर – महाराष्ट्राला आतापर्यंत १ कोटी ६ लाख कोरोना लस, रेमडीसीवीर – ४ लाख ३५ हजार, तीन लाख ऑक्सिजन उपकरणांची पीएम केअर्स फंडातून खरेदी करण्यासाठी मंजुरी, त्यातही महाराष्ट्राला मोठा वाटा, भारतीय रेल्वे मार्फत महाराष्ट्राला १७४ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा, ५ जानेवारी २०२१ रोजी १० ऑक्सिजन प्लांट निर्मितीसाठी पीएम फंडातून २०१ कोटी रु त्यात १ प्लांट तयार, केवळ आरोग्य सुविधेसाठी ९१६ कोटी रु ची भरीव तरतूद, ९ लाख ८८ हजार पीपीई किट, १५ लाख ५९ हजार इतके एन-९५ मास्क, ४७ लाख २० हजार हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन टॅबलेट, पीएम फंडातून व्हेंटिलेटर इत्यादी दिले परंतु राज्य सरकारने केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर न वापरता परत पाठवले. आता १५ मे पर्यंत म्हणजे साधारणतः १ महिनाभराचे लॉकडाऊन सरकारने लावले आहे ते लावताना बारा बलुतेदार किंवा लहान लहान व्यापारी, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी पॅकेज देणे आवश्यक होते परंतु या सरकारने दमडीचे पॅकेज दिलेले नाही, महाराष्ट्रातील जनता या लोकांना माफ करणार नाही असा घणाघात माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला.

केंद्राच्या नावाने कायम बोंब मारणाऱ्या राज्यसरकारने इतर राज्यांप्रमाणे लस बुक केली नाही, इतर राज्यसरकार ज्याप्रमाणे स्व-खर्चातून लस खरेदी करत आहेत त्याप्रमाणे लस खरेदी केली नाही, असे असले तरी कोव्हीशील्डच्या १३ लक्ष तर कोवॅक्सिनच्या ३ लक्ष ५७ हजार अशा एकूण १६ लक्ष ५७ हजार लस महाराष्ट्राला दिल्याबद्दल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार व्यक्त केले.

केंद्र सरकारवर आरोप करणाऱ्या महाराष्ट्र सरकारची मागील दीड वर्षापासून १५० व्हेंटिलेटर ची खरेदी रखडली आहे, केंद्र सरकार कडू ८० कोटी गरीब नागरिकांना मे महिन्यात पंतप्रधान योजने अंतर्गत गहू तांदूळ दिले जाणार तेच आम्ही मोफत देणार हे सांगण्यात मंत्री धन्यता मानत आहेत. १ तारखेपासून १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण करणार असं आरोग्यमंत्री राजेश टोपे दुपारी पत्रकार परिषदेत सांगतात ४ वाजता शक्य नाही असं सांगतात सरकारमधील मंत्री गोंधळलेले असून पोरखेळ असल्यासारखे वागत आहेत. उठ सूट केंद्राकडे बोट दाखवणे हा एकमेव धंदा सुरु आहे. जनहिताचा कोणताही अजेंडा यांच्याकडे नाही फक्त केंद्र सरकार आणि महाराष्ट्र भाजपला विरोध करण्यासाठी एकत्र आले आहेत. केंद्र सरकारकडून मोफत दिल्या जाणाऱ्या लस स्वतःच्या नावे मोफत वाटणार असले तरी जनतेला सर्व माहित आहे असा टोला देखील यावेळी लोणीकर यांनी लगावला.

केंद्र सरकारकडून मोफत मिळणाऱ्या लसींबाबत श्रेय घेण्यासाठी आधाडीच्या मंत्र्यांमध्ये ओढाताढ सुरु असून सरकार म्हणून काहीच करणार नाही केवळ श्रेय मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. परदेशातून ऑक्सिजन भारतात आला पण महावसुली सरकारचा गहू तांदूळ आणि १५०० रु काही अजून आले नाहीत. तपासण्या कमी का करण्यात आल्या ? लसीकरणसाठी अजित पवार आणि राजेश टोपे यांनी घोषित केलेल्या जागतिक टेंडरचे काय झाले ? लसीकरणासाठी ६००० कोटींची तरतूद केली असल्याची टोपेंची घोषणा त्याचे काय झाले ? जालना जिल्ह्यात १० हजार रेमडीसीवीर इंजेक्शन आले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले मग टंचाई कशी ? केंद्र सरकारवर खापर फोडण्यापेक्षा इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने लस बुक का केली नाही ? असा सवाल देखील यावेळी लोणीकर यांनी केला.

महाराष्ट्र राज्याला आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत केंद्र सरकारने केली आहे करत आहे, करणार आहे यात शंका नाही. महाराष्ट्रातील दररोजचे मृत्यू थांबविण्यात राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारमधील मंत्री दररोज खोट्या पत्रकार परिषद घेत आहेत, राज्यातील 12 कोटी जनतेला दररोज खोटी माहिती देत आहेत. यावर राज्यसरकारने लक्ष द्यावे? आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यात रेमिडिसीवीर बाजार होत आहे तो रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात. कोरोना काळात सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाली असून तरी देखील हे ‘वसुली सरकार’ सर्व बाबतीत नापास झाले असल्याचा टोला लोणीकरांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या