प्रेक्षकांचा भ्रमनिरास करणारा ‘बबन’

Baban-Movie-review

‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्या सिनेमातून आपली वेगळी छाप सोडत राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवणाऱ्या दिग्दर्शक भाउराव कऱ्हाडे यांचा बबन हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे . ‘बबन’ या सिनेमातून पुन्हा एकदा त्यांनी ग्रामीण भागातील कथा प्रेक्षकांसमोर आणली आहे. गावात राहाणाऱ्या एका तरुण आणि उमद्या तरुणाची कथा बबन या चित्रपटात मांडण्यात आली आहे. गरीब परिस्थितीचे भान असणारा प्रत्येक स्वाभिमानी व्यक्तीला एखादा व्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढावे असे वाटत असते. असा विचार करणाऱ्या सर्वांचे प्रतिनिधित्व करणारा बबन हि नायक आणि सिनेमा आहे.

‘बबन’ ही शेतकरी कुटुंबातील महाविद्यालयीन तरुणाची कथा आहे.  गरीब कुटुंबातील बबन (भाऊसाहेब शिंदे) ला आपले वेगळे अस्तित्व निर्माण करायचे आहे, वडील (भाऊराव कऱ्हाडे) पट्टीचे दारूबाज आहेत यामुळे त्याला कोणताही आधार नाही, आपण काही तरी करायला हवे याची जाणीव त्याला आहे, शिक्षणाबरोबरच दुध संकलन करून एमआयडीसी मधील कंपन्यांना पुरवण्याचे काम करतो, मात्र त्याचं हेच स्वाभिमानाने जगणे काही लोकांना खटकते.बबनचे त्याच्याच वर्गातील वर्गातील कोमल (गायत्री जाधव)वर प्रेम आहे,मात्र लव्ह ट्राय एँँगल चा ट्वीस्ट असल्यामुळे त्याला इथेही संघर्ष करावा लागतोय.  गावातील राजकारण तसेच स्वाभिमानी ‘बबन’च्या आयुष्यात लव्ह ट्राय एँँगलमुळे येणाऱ्या अडचणी आणि  स्वप्नांचा पाठलाग करताना येणारी संकट याचा तो कसा सामना करतो? कोमल आणि बबन यांची प्रेमकथा फुलते का? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी ‘बबन’ पहायलाच हवा.

राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवणाऱ्या दिग्दर्शक भाउराव कऱ्हाडेयांच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या मात्र ‘बबन’ या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडला आहे . चित्रपटाची कथा – पटकथा यामध्ये बऱ्याच अनाकलनीय गोष्टींचा समावेश केल्याने सामान्य प्रेक्षक गोंधळात पडणार याची १००% खात्री देता येईल. बऱ्याच वेळा तर दिग्दर्शकाला नक्की काय म्हणायचे आहे तेच समजत नाही. ग्रामीण ढंगातील सिनेमा आहे हे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असताना शिव्यांचा बेसुमार वापर का केला आहे याचं उत्तर कदाचित दिग्दर्शकच देवू शकतात.प्रेमकथा , गावातील राजकारण , नायकाचा संघर्ष यापैकी नक्की काय आहे या सिनेमात तेच समजत नाही असं असलं तरीही अत्यंत साधी – सोपी भाषा ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे, ग्रामीण भागातील व्यक्तीरेखा उत्तम हेरल्या आहेत यात शंका नाही.

चित्रपटात भाऊराव कऱ्हाडे यांनी केलेली बबनच्या वडिलांची भूमिका , भाऊसाहेब शिंदे तसेच गायत्रीने देखील उत्तम अभिनय केला आहे.शेवटच्या दहा मिनिटांत शेवट नक्कीच अंगावर येतो पण शेवट अंगावर येणारा आहे म्हणून किती प्रेक्षक वेळ आणि पैसे खर्चून सिनेमा पहायला जातील याबद्दल शंकाच आहे. शिवाय या सिनेमातले अनेक प्रसंग या सिनेमात का आहेत ते कळत नाही. उदाहरणार्थ, बबन आणि शेजारच्या मुलीचा प्रणय प्रसंग, नायकाच्या पँटच्या खिशात कंडोमचे पाकीट मिळाल्याचा प्रसंग,गरीब कुटुंबाला मदतीचा वारंवार दाखवला जाणारा प्रसंग यांचं सिनेमात असण्याचं प्रयोजन कळत नाही.

दिग्दर्शकाचा अजून एक प्रताप म्हणजे आधीच लांबलेल्या चित्रपटात तब्बल पाच गाणी अक्षरशः घुसडली आहेत. हर्षित अभिराज, ओमकरस्वरूप यांनी संगीतबद्ध केलेली गाणी चांगली आहेत परंतु ती कुठेही अचानक येतात यामुळे ती खटाकतात.संपूर्ण सिनेमाचा म्हणून जो एकसंध परिणाम व्हायला हवा, तो होत नाही. परिणामी ‘ख्वाडा’कर्त्याची ही दुसरीच कलाकृती काहीशी अपेक्षाभंग करून जाते. दोन वर्षापूर्वी आलेल्या सैराट सिनेमाची कॉपी करण्याचा प्रयत्न झाला आहे की काय असे सिनेमा पाहताना वारंवार वाटते. इतरांची कॉपी करण्यापेक्षा दिग्दर्शकाने ख्वाडा चित्रपटाच्या वेळी जे वेगळेपण जपलं होतं तेच तसंच ठेवलं असत तर बरं झाला असत असं वाटत.

– दीपक पाठक