‘गॅटमॅट’ मधील बाबा सेहगलचं रॅप ठरतंय सुपरहिट

पुणे- प्रेमी जोडप्यांची सेटिंग जुळवून आणणाऱ्या आगामी ‘गॅटमॅट’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. तरुणवर्गाला आपलसं करण्यास येत असलेल्या या सिनेमाचा आशयच मुळात ‘गॅटमॅट’वर आधारीत असल्याकारणामुळे, या सिनेमाची प्रदर्शनापुर्वीच अधिक प्रसिद्धी होत आहे. विशेष म्हणजे या प्रसिद्धीत हिंदी रॅपर बाबा सेहगलच्या ‘एक पेग दोन पेग’ या गाण्यानेदेखील हातभार लावला आहे.

तरुणाईची झिंग चढवणारं ‘गॅटमॅट’ सिनेमातील हे गाणं सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतंच लाँच करण्यात आलं. अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस पडत असलेल्या या ड्यूएट गाण्यामध्ये जुईली जोगळेकरने बाबा सेहगलला सुरेख साथ दिली आहे. कॉलेजपार्टीवर आधारित असलेलं हे गाणं सचिन पाठक यांनी लिहिले असून, सुप्रसिद्ध संगीतदिग्दर्शक समीर साप्तीस्करचे संगीत या गाण्याला लाभलं आहे. युथला आपल्या तालावर थिरकवणारं हे गाणं अक्षय टंकसाळे, निखील वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे या सिनेमातील चार प्रमुख कलाकारांवर चित्रीत करण्यात आलं आहे.

अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन निशीथ श्रीवास्तव यांनी केलं आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचे राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव निर्माते आहेत. कॉलेज विश्वाची रंजक सफर घडवून आणणारा हा सिनेमा, मनोरंजनाचे प्रेक्षकांसोबत ‘गॅटमॅट’ जुळवण्यास येत आहे.