वाढत्या लोकसंख्येच्या समस्येला रोखण्यासाठी बाबांनी सुचविला ‘रामबाण’ उपाय

अलिगड – ”दोनपेक्षा अधिक मुलांना जन्माला घालणाऱ्यांचा मतदान अधिकार काढून घ्या. शिवाय, अशा लोकांना निवडणूक लढण्यासही परवानगी दिली जाऊ नये”, असे परखड मत योगगुरू बाबा रामदेव यांनी मांडले आहे. तसंच, दोनपेक्षा अधिक मुलं जन्माला घालणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरीचीही संधी नाकारण्यात यावी, असंही बाबा रामदेव म्हणालेत.

पंतजली परिधान शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना बाबा रामदेव यांनी या महत्वाच्या मुद्यावर भाष्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षांनी राजकीय स्वातंत्र्य मिळाले आहे. तसेच देशाला आर्थिकदृष्ट्या ही स्वातंत्र्य मिळवण्याचे आपले उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात लोकसंख्येचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुणी दोन पेक्षा अधिक बालकांना जन्म देत असतील तर त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून रोखले पाहिजे. त्यांनातर शाळा आणि हॉस्पिटल सारख्या सोयी मोफत देणे ही थांबवले पाहिजे, असेही ते म्हणाले.