बाबा बिझनेस…

dhongi baba

मध्यंतरी whats app वर एक मेसेज वाचला होता. शाळेतले हुशार विद्यार्थी शिकून इंजिनिअर, डॉक्टर होतात. काठावर पास होणारे गुंड आणि राजकारणी होतात. तर नापास होणारे बाबा होतात. हे बाबा सर्वाना आपल्या पायाशी लोळवतात. ह्यातला गमतीचा भाग सोडला तर लिहलेल सगळ खरच आहे कि. बाबा बनण्यासारखा बिझनेस आज तुम्हाला म्युचल फंड पेक्षा जास्ती परतावा देतो आहे. शेअर मार्केट खाली पडल तर परतावा जास्ती आणि वर गेल तरी परतावा जास्ती. वाचताना खोट वाटेल पण आजूबाजूला बघा. बाबा लोकांच्या संपत्तीत झालेली वाढ हि चक्रवाढ व्याजापेक्षा जास्ती आहे.
नो इनपुट ते १००% आउटपुट देणारा हा बिझनेस पैसा, प्रतिष्ठा तर देतोच पण आपल्या शब्दाखातर जीवाला जीव देणारे लोक पण. बर ह्यात अडाणी लोक असतात अस नाही. चांगले शिकलेले, मानसन्मान असलेले, राजकीय वजन असलेले सगळेच. त्या सोबत लोकांना पावित्र्य करण्याच पावन पुण्य हि आपण कामावूच शकतो. मग ते अगदी विनयभंगापासून ते बलात्कार का असेना? आपण हे काम देवाच्या आज्ञेनुसार करत असतो. म्हणजे मन मे एक साथ दो दो लड्डू फुटे नाही का?
बाबा बिझनेस साठी काय लागते ह्याचा अभ्यास केला तर फक्त जिभेवर शब्द असायला हवेत. तत्वज्ञान साच्यात बसवता यायला हव. एकदा नाव झाल कि बाकी सगळ आपले अनुयायी करत जातात. भारतासारख्या देशात न सुटलेले प्रश्न खूप आहेत. अगदी शिक्षण, नोकरी पासून वैवाहिक संबंधांपर्यंत. काही प्रश्नांची उत्तर माहित असून सुद्धा ते स्वीकारायची मानसिकता झालेली नसते आणि काही प्रश्नच कुठे बोलता येत नाही. मग हेच प्रश्न उचलायचे. कारण उत्तरासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो हि प्रगल्भ नसलेल्या माणसाची मानसिकता असते. असे लोक भारतासारख्या देशात खूप आहेत.

 gurmeet ram rahim rape case
file photo

बाबा बिसनेस काढताना च्या काही टिप्स. शिक्षण नाही मग चांगली नोकरी मिळणार नाही हे उघड सत्य आहे. मेहनत न करता झटपट पैसा मिळायला सगळ्यांचा राजयोग नसतो हे सत्य पचवण्याची ताकद आपली नसते. मग हेच आपण हेरायच. राजयोग निर्माण करता येऊ शकतो पण त्यासाठी शरण जाण्याची किंमत समोरचा मोजायला तयार असतोच. वैवाहिक जीवनात किंवा सेक्स मध्ये सगळ्यात जास्ती प्रश्न असतात. शारीरिक संबंध कसे करावेत ते मुल कोणत्या लिंगाच व्हावं इथपर्यंत. हे विषय समाजात पाप- पुण्याच्या अधिकाराखाली येत असल्याने पुण्य स्मरण करून आपणच ह्या विषयाला हात घालायचा. कोणालाही न सांगता ह्या प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकतो हे समोरच्याच्या गळी उतरवल कि शिकलेला पण आपली बुद्धी विकून बाजारात बसतो. स्त्री स्वतः किंवा तिचा जोडीदार ह्यापेकी कोणाएकाला हे पचवल कि पुढचा रस्ता फक्त हायवे असतो. सगळ्यात मोठ गणित म्हणजे १० जणांना ह्यात गुंतवल कि २-३ तरी परतावा देतातच. मग हेच २-३ हाताशी घेऊन पुढचे सावज हेरायचे. ह्या परताव्या पलीकडे शरीर अनुभवायचा बोनस असतोच.

आता बिझनेस ची सुरवात झाली कि आपला अनुयायी पंथ निर्माण करायचा. आधी जमिनीवर पाय असलेला देखावा बेमालूमपणे करायचा कारण त्यावर भाळून तर आपला पंथ वाढतो. एकदा पंथ वाढला कि मग ओळखी वाढवायच्या. पोलीस, सरकारी अधिकारी, लोकल स्तरावरचे प्रतिनिधी सगळेच. त्यांना खास मान आणि त्यांच्या लोकांचा खास सन्मान. एकदा हे लोक गळ्यात उतरले कि मग मोठे मासे. कारण तोवर अनुयायी इतके वाढतात कि पूर्ण निवडणुकीची प्रक्रिया आपल्या बोलण्यावर आपण बदलू शकतो हा विश्वास मोठ्या माशांना झालेला असतो. त्यामुळे तुमची मर्जी संभाळण हा राजकीय पटलावरील भाग होऊन जातो. निवडणुका झाल्या कि मोठे मासे गळाला लागले असतात. त्यांना पण थोडी चटक लावली कि आपला बिसनेस आंतरराष्ट्रीय झालाच म्हणून समजा. आता हीच वेळ असते उडायची. कायद्याचे रक्षक, लोकशाहीचे चेहरे, बिझनेस करणाऱ्या पासून ते अंध अनुयायी सगळेच आपल्या खिशात असते. पैसा पाण्यासारखा वाहतो. कारण पाप करून ते धुण्यासाठी चे समज आपल्या देशात असे पेरले आहेत कि पाप करा पण शिर्डीच्या साईबाबांना, लालबागच्या राजाला, तिरुपतीच्या बालाजी ला किंवा वैष्णोदेवी च्या पुढे पैश्याचे रकाने भरले कि सगळ्या पापापासून आपली मुक्तता होते. प्रत्येक वेळी तिकडे जायला मिळतेच अस नाही. मग आपण असतोच मधले बाबा.

बाबा बिझनेस मधला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काळ्याच गोर आपण समाजाच्या नावाखाली लगेच करू शकतो. मग काळापैसा, वृत्ती आपसूक आपल्या पायाशी लोळण घेतात. त्याची कुठे जाहिरात करावी लागत नाही. सुरवातीला मात्र आपण कुठून तरी दीक्षा किंवा गोल्ड मेडल मिळवल्याचे दाखले द्यायचे. माणूस सगळ्यात निश्चिंत असतो तिकडे आपली जाहिरात करायची. बाबा कोणत बनायचं ते ठरवलं कि मग आपल्याला प्रांत आणि आकृत्या जोडता येतात. सुरवात शहरात असेल तर सेक्स पासून करायची आणि टोयलेट हे आपल मुखपत्र. गावातून असेल तर एखाद्या सरपंचाला पकडून २-४ गरिबांना दान द्यायचं. त्यांच्यावर आपण कृपा केली त्यांची कृपादृष्टी आपल्यावर होतेच. मग एकदा सुरवात झाली कि आपल्या बिझनेस ची वाढ पातंजली पेक्षा जास्ती जोमाने होते .

शिक्षण, प्रगल्भता, खरे तर कॉमन सेन्स आपल्याकडे योग्य रीतीने शिकवला जात नाही. श्रद्धेचा फायदा आपल अस्तित्, स्व गमावण्या पर्यंत घेता येऊ शकतो ह्यातच आपल मार्केट किती मोठ आहे ह्याचा अंदाज आलाच असेल. बर ह्यात स्पर्धा करायची नाही. धंद्यात असलेले सगळेच आपले असतात त्यामुळे एकमेकांवर असलेली कृपादृष्टी दोघांची कृपाच करते. आपला भूतकाळ कोणी खोदायचा प्रयत्न केला किंवा आपल्या प्रणय क्रियानां बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाच तर आपली वजन वापरायची. कायदा काय आपल्याच हातात असतो. आत गेलो तरी भक्ती कमी होत नाही. आपल चांगल लक्षण तुरुंगात सगळ्यांचा आधीच लक्षात येईल अशी सोय कमावलेल्या पैशाच्या जोरावर आधीच करून ठेवायची. त्यामुळे गिरे तो भी अपनी टांग हमेशा उपर असणारा हा बिझनेस म्यानेजमेंट चा विषय होत नाही ह्याच मला आश्चर्य वाटते.

-विनीत वर्तक

(महाराष्ट्र देशा लेखकाच्या मताशी सहमत असेलच असे नाही )