अखेर येडियुरप्पा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

नवी दिल्ली: कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.आज येडियुरप्पा यांनी एकट्यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 10 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे.

सुप्रीम कोर्टाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे 5 पर्यंत ऐतिहासिक सुनावणी घेत, येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला. कर्नाटकच्या राज्यपालांनी येडीयुरप्पांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देताच काँग्रेसनं रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टात पहाटेपर्यंत युक्तीवाद झाल्यानंतर, कोर्टाने काँग्रेसची मागणी अमान्य केली. तसंच येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे बी एस येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालाय.

मात्र मध्यरात्रीच्या या ऐतिहासिक घटनानंतरही भाजपचा अडथळा अजून कमी झालेला नाही. कारण कोर्टाने येडियुरप्पांना शपथविधीसाठी हिरवा कंदील दाखवला असला, तरी समर्थक आमदारांची यादीही मागवली आहे.याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी 10.30 वा. होणार आहे.