मालाड घटनेनंतर औरंगाबाद पालिकेला जाग, ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतींना नोटिसा

औरंगाबाद : पावसाळा सुरू झाल्यानंतर महापालिकेला शहरातील धोकादायक इमारतींची आठवण झाली आहे. यंदादेखील शहरातील ४८ धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्यात राहणाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे सोपस्कर प्रशासनाने पूर्ण केले आहे. मात्र यापुढे कारवाईचा भाग पूर्ण करण्यासाठी मनपा प्रशासन कुठल्या हालचाली करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून दर वर्षी अनेकांचे बळी जातात. मुंबई मालाड भागातील चार मजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याविषयी माहिती घेतली असता शहरात ४८ धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. दर वर्षी महापालिकेतर्फे धोकादायक इमारतींची यादी तयार केली जाते. बोटावर मोजण्याएवढ्या इमारतींवर कारवाई केली जाते. त्यानंतर पुढील वर्षी पुन्हा धोकादायक इमारतींचा विषय समोर येतो. काही इमारती पावसाळ्यात कोसळतातही.

यातील अनेक ठिकाणी घरमालक भाडेकरू असा वाद असल्याने या वादातून इमारती धोकादायक असल्याच्या तक्रारी केल्या जातात. जुन्या शहरातील गुलमंडी भाग, दिवान देवडी, कासारी बाजार, रंगारगल्ली, सिटी चौक, धावणी मोहल्ला, शहागंज, दलाल वाडी, पैठण गेट, औरंगपुरा भागात धोकादायक इमारतींची संख्या जास्त आहे. नोटिसा बजावण्यात आलेल्या इमारतींमध्ये या भागाचा समावेश आहे. महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींना कलम २६४ नुसार नोटिसा बजावल्या आहेत नागरिकांनी स्वतः इमारतीचा मोठा झालेला भाग काढून टाकावा किंवा दुरुस्ती करावी असे नोटिशीत नमूद करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP