fbpx

पुणे : गणेशमूर्तीची विटंबना करणाऱ्या कॉंग्रेसच्या नगरसेवकाला अटक

पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गोंधळ घातल्याबद्दल , गणेशमूर्तीची विटंबना केल्याबद्दल तसेच मारहाण केल्याबद्दल काॅंग्रेसच्या  नगरसेवकाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेवक अविनाश बागवे असं या नगरसेवकाचे नाव असून तो माजी गृहराज्य मंत्री आणि पुणे शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांचा मुलगा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीत काल सायंकाळी कासेवाडी येथे हा मारहाणीचा प्रकार घडला होता. मिरवणुकीदरम्यान अशोक तरुण मंडळाचा गणपती विसर्जनासाठी जात असतांना मिरवणुकीतील ट्रॅक्टरचा चालक आणि साऊंड सिस्टिमचा मालक यांना मारहाण करण्याची चिथावणी अविनाश बागवे यांनी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

बागवे यांचा आदेश प्राप्त होताच कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरचालक सोमनाथ म्हस्के आणि ओंकार कोळी यांना जबर मारहाण केली. साऊंड सिस्टिमची यात मोडतोड झाली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण झाला. चप्पल, शूज, दगड हे मिरवणुकीच्या दिशेने या कार्यकर्त्यांनी फेकले. या सगळ्या प्रकारात गणेशमूर्तीची विटंबना झाल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. थोड्यावेळापूर्वी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गोंधळ घातल्याबद्दल आणि मारहाण केल्याबद्दल बागवे यांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.