खुशखबर! विमानाला विलंब झाल्यास प्रवाशांना मिळणार नुकसान भरपाई 

Mumbai flight started

नवी दिल्ली – एअरलाईन्स कंपन्यांच्या चुकीमुळे विमानास विलंब झाला तर आता  कंपनीला संबंधित  प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. जर विमानाला पुढील दिवसापर्यंत विलंब झाला तर कोणत्याही अतिरिक्त शुल्कासह प्रवाशांच्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय देखील  करावी लागेल.

कनेक्टिंग फ्लाईट चुकली तरीही कंपन्यांना भरपाई द्यावी लागेल. विमानाला फारच उशीर झाल्यास प्रवासी तिकीट रद्द करु शकतात आणि त्यांना संपूर्ण पैसे देखील  परत दिले जातील. अशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली असून, सरकारने याबाबत मसुदा तयार केला आहे. पुढील २ महिन्यात हे नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे.

मसुद्यातील तरतुदींची माहिती देताना हवाई उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले की, “जर प्रवाशाने विमानाचं तिकीट बुक केल्यानंतर 24 तासांच्या आत रद्द केलं तर यासाठी कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागणार नाही. याशिवाय निर्धारित वेळेच्या आधी तिकीटातील इतर बदलही मोफत करता येणार आहेत.” “याशिवाय प्रवासाच्या 96 तास आधी तिकीट रद्द केल्यास कोणतंही शुल्क द्यावा लागणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कॅन्सलेशन चार्ज हा तिकीटाचा दर आणि इंधन शुल्क यांच्या एकूण दरापेक्षा जास्त असू शकत नाही,” असंही जयंत सिन्हा यांनी यावेळी  स्पष्ट केलं.