सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला स्वायत्त दर्जा

uni pune

पुणे: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ६२ स्वायत्त शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला स्वायत्त दर्जा देण्यात आला असून आता विद्यापीठाला यूजीसीच्या परवानगीशिवाय मोठे निर्णय घेता येणार आहेत.

यामध्ये ५ केंद्रीय विद्यापीठे, २१ राज्य विद्यापीठे, २६ खासगी विद्यापीठे आणि १० महाविद्यालयांचा समावेश आहे. स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचाही समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातली काही संस्था आणि महाविद्यालयांचाही समावेश आहे.

स्वायत्त दर्जा मिळालेल्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांना (विद्यापीठ अनुदान आयोग) यूजीसीच्या परवानगीशिवाय मोठे निर्णय घेता येणार आहेत. तसेच विद्यापीठांवर यूजीसीचंच नियंत्रण असेल. मात्र त्यांना नवा अभ्यासक्रम, नवा कोर्स, नवा विभाग सुरु करण्यासाठी यूजीसीच्या परवानगीची गरज नसेल.

विद्यापीठांना कार्यक्षेत्राबाहेर विविध अभ्यास केंद्र, रिसर्च पार्क, परदेशी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश आणि परदेशी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्तीही करता येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही विद्यापीठं तज्ज्ञ शिक्षकांना आकर्षित करण्यासाठी सातव्या वेतन आयोगापेक्षाही जास्त पगार देऊ शकतील. ही विद्यापीठं जगभरातील विद्यापीठांशी शैक्षणिक करार करु शकतात.