शहराला अखंडीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी स्वयंचलीत यंत्र

औरंगाबाद : गणेशोत्सवानंतर जायकवाडी येथे शहराला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पाणी उपशाचे स्वयंचलित संयंत्र बसविले जाणार आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहराला जायकवाडी जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा अविरतपणे सुरू राहावा यासाठी महापालिकेने जायकवाडी आणि फारोळा येथील पाणी उपसा केंद्राच्या ठिकाणी स्वयंचलित विद्युत यंत्र (रिमिनिंग युनिट) बसविले; तर वारंवार विद्युत यंत्रणेतील किरकोळ बिघाडाने पाणीपुरवठा खंडित होणार नाही.

या एका स्वंयचलित विद्युत यंत्रासाठी वीस ते पंचवीस लाख रुपयांचा खर्च येणार आहे. स्वयंचलित विद्युत यंत्र (रिमिनिंग युनिट) नसल्याने एका विद्युत वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यास दुसर्‍या वाहिनीवरून विद्युत पुरवठा घेण्यासाठी विलंब लागतो; मात्र स्वयंचलित विद्युत यंत्र बसवले, तर एका विद्युत वाहिनीतील पुरवठा बंद झाला तर तो आपोआप स्वयंचलित यंत्रामार्फत दुसर्‍या वाहिनीवरून सुरू होऊन पाण्याचा उपसा कायम सुरू राहतो. यासाठीचे अंदाजपत्रक महापालिकेला देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले