Ind Vs Aus: नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय

ind-vs-aus

टीम महाराष्ट्र देशा: भारताचा विश्वचषकापूर्वीचा शेवटचा एकदिवसीय सामना आज दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात जडेजा आणि मो.शमीला तर ऑस्ट्रेलियाच्या संघात मार्कस स्टोइनिस आणि नाथन लायन ला संधी देण्यात आली आहे

युवा खेळाडूंना विश्वचषकाच्या अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने आघाडी घेतली होती. परंतु ऑस्ट्रेलियाने तिसरा व चौथा सामना जिंकून मालिकेत रंगत निर्माण केली. आता शेवटचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे.

चौथ्या सामन्यात भारताने दिलेल्या बलाढ्य लक्षाचा पाठलाग केल्याने ऑस्ट्रेलियाच्या संघात नवीन चैतन्य असणार यात शंका नाही. मागच्या सामन्यात मोठ्या लक्षाचा बचाव करण्यात अपयश आल्याने भारतीय गोलंदाजांना कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. मागच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि रोहीत शर्मा यांना सूर गवसला तरी मधल्या फळीतील फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रिषभ पंत यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल.

ऑस्ट्रेलियासाठी मागील दोन्ही सामन्यात फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे परंतु गोलंदाजांनी मागच्या सामन्यात खूप धावा दिल्याने त्यांना या सामन्यात चुका सुधाराव्या लागतील. एकूणच हा सामना अतितटीचा होणार यात शंका नाही. सामन्यात चांगले प्रदर्शन करून मालिका जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील.