राजकीय फायद्यासाठी औरंगाबादची प्रतिमा दंगलीचे शहर अशी करण्यात आली : खा. इम्तियाज जलील

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबादची प्रतिमा दंगलीचे शहर अशी करण्यात आली. पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत आतापर्यंत राजकारण करण्यात आले. त्यामुळे आता या शहराला आदर्श शहर करण्यासाठी जनतेने स्वत:च्या अधिकारांची जाणीव ठेवली पाहिजे, असे म्हणत औरंगाबादचे नवोदित खा. इम्तियाज जलील यांनी आजपर्यंत चालत आलेल्या औरंगाबाद शहरच्या राजकारणावर भाष्य केले. औरंगाबाद येथील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी खा. जलील म्हणाले की, लोकप्रतिनिधींना प्रतिप्रश्न विचारण्याचा हक्क आपण विसरल्याने शहर बकाल झाले आहे. राजकीय फायद्यासाठी हिंदू-मुस्लिम तणाव वाढवून औरंगाबादची प्रतिमा दंगलीचे शहर अशी झाली आहे. आतापर्यंत रस्ते, पाणी, उद्योग, पर्यटन, शिक्षण या सुविधांकडे दुर्लक्ष करून राजकारण खेळले गेले. त्यामुळे शहर हे अविकसित राहिले.

तसेच औरंगाबाद हे पाण्याचे खासगीकरण करणारे हे एकमेव शहर होते. काही नेत्यांच्या आर्थिक फायद्यासाठी समांतर योजना लादली होती. शहराबद्दल आत्मियता असलेल्या नागरिकांनी योजना बंद पाडली. मला मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करावा लागला.त्यामुळे जनतेने ठेकेदार, पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे संगनमत ओळखणे गरजेचे आहे, असे देखील जलील यावेळी म्हणाले.