औरंगाबादकरांची स्मार्ट सिटी बस दोन वर्षांची झाली

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी औरंगाबादकरांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवलेल्या ‘स्मार्ट सिटी बस’ने आज दोन वर्षे पूर्ण केली. प्रवाशांना सुखकर सेवा देऊन स्मार्ट सिटी बसने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहरातील प्रवाशांची गरज ओळखून २३ जानेवारी २०१९ रोजी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने १४ मार्गांवर २३ बसगाड्यांची बससेवा सुरू केली. दररोज ९ हजार ४१३ प्रवाशांना सेवा देऊन सिटी बसने त्यांचा प्रवास सुखकर केला.
मार्च २०२० पर्यंत स्मार्ट सिटी बसने दररोज १३ हजार ८०० किलोमीटर, १२०० सहली, ३१ मार्गांवर सेवा दिल्या. कोरोनानंतरच्या काळात स्मार्ट बसने नोव्हेंबर २०२० मध्ये अँड्राॅइड आधारित ई तिकिट, डिजिटल पेमेंट सिस्टम, मोबाईल अ‍ॅप, अद्यावत वेब पोर्टल, वाहन ट्रॅकिंग अशा अनेक स्मार्ट वैशिष्टांसह पुन्हा सुरू करण्यात आली. १०० अत्याधुनिक बसथांबे देखील शहरात तयार झाले आहेत.

स्मार्ट सिटी बस रुग्णसेवेतही पुढे
महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील देखील सर्वात स्वस्त बस म्हणून आपली शहर बस नावारुपास येत आहे. मार्चमध्ये कोविडच्या आगमनानंतर औरंगाबाद महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन रूग्णांच्या सोईसाठी बसचा वापर करण्याचा निर्णय घेतला. ५० बसेसच्या माध्यमातून रूग्णांना सेवा देण्यासाठी स्मार्ट सिटी बस विभाग सरसावला होता. स्मार्ट बसेस कोविड रूग्ण, कोविड योध्दा यांच्या वाहतुकीसाठी रूग्णवाहिका म्हणून वापरण्यात आल्या.

२ वर्षे स्मार्ट सिटी बसच्या कर्तृत्वाची
स्मार्ट सिटी बसने गेल्या दोन वर्षात अपघातमुक्त सेवा दिली आहे. मुकूंदवाडी डेपोत १०० बसेस तसेच नवीन ५० बसगाड्यांसाठी डेपोचे नियोजन आहे. बस विभागातील भरती प्रक्रियेत यांत्रिकी, लेखापाल, लिपिक आणि नियंत्रण या क्षेत्रात माजी सैनिकांना स्थान देण्यात आले. सद्यस्थितीत करमाड व घाणेगाव मार्गावर अतिरिक्त सेवा देण्यात येत आहे. औरंगाबाद आणि परिसरातील भागात पाच सदस्यीय टिम सेवा देण्यासाठी कार्यरत आहे.
– प्रशांत भुसारी, मुख्य चालान व्यवस्थापक

महत्वाच्या बातम्या