औरंगाबादकरांनो नियम पाळा, अन्यथा पुन्हा निर्बंध! मनपा आयुक्तांचा इशारा

औरंगाबाद : शहरात सोमवार (दि.७ )पासून सर्व निर्बंध शिथील करण्यात येऊन सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र यापुढे आता दर गुरूवारी पॉझिटिव्ही रेट आणि ऑक्सिजन बेड्सचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यात वाढ झाल्याचे दिसल्यास शहरात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता जबाबदारीने वागावे, गर्दीत जाणे टाळावे, मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी सध्यस्थितीवर केले आहे.

ज्या शहराचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा शहराचा पहिल्या लेव्हलमध्ये समावेश केला आहे. त्यानुसार औरंगाबाद शहराचा पहिल्या टप्प्यात समावेश झाल्यामुळे सर्व निर्बंध शिथील केले गेले असून व्यवहार सुरू झाले आहेत. याबद्दल आयुक्‍त पांडेय यांनी सोमवारी शहरवासीयांचे माध्यमांसमोर अभिनंदन केले. ते म्हणाले की, नागरिकांनी शिस्त पाळल्यामुळेच शहराचा पहिल्या लेव्हलमध्ये समावेश झाला. मात्र इथून पुढे नियम पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र आता दर आठवडयाच्या गुरूवारी जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सीजन बेड्सचा आढावा घेतला जाईल. त्यात शहरातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सीजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले तरच सर्व व्यवहार सुरू राहतील. यात वाढ झाल्याचे निदर्शनास येताच निर्बंध वाढवून तिसर्‍या किंवा चौथ्या टप्प्यात शहराचा समावेश होण्याचा धोका आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करुन शहराला पहिल्या लेव्हलमध्ये ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पांडेय यांनी केले.

सध्या शहरात ऑक्सीजन बेड्सची कमतरता आहे. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने आतापासून पालिकेच्या माध्यमातून ऑक्सीजनचे ८०० बेड्स वाढविले जाणार आहेत. कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन बेड्सची व्यवस्था केली जाईल. त्यासोबतच कोरोना चाचण्या देखील वाढविण्यात येतील, असे आयुक्‍त पांडेय यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP