औरंगाबादकरांचे जलसंकट कायम, एकाच आठवड्यात दोनदा फुटली पाईपलाईन

औरंगाबाद : पैठण रोडवरील चितेगाव टोलनाक्यापासून ५० मीटर अंतरावर असलेली औरंगाबादला पाणीपुरवठा करणारी १२०० मिमि व्यासाची जलवाहिनी मंगळवारी रात्री फुटली. यातून हजारो लिटर पाण्याची गळती सुरू झाली. दुरुस्तीसाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ जायकवाडी पंप हाऊसमध्ये शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केले. त्यामुळे शहरातील ज्या भागांना बुधवारी पाणी मिळणार होते त्यांना आज पाणी येईल तर गुरुवारी ज्या ठिकाणी पाणीपुरवठा होणार होता त्या ठिकाणी शुक्रवारी पाणी येईल. गेल्या महिन्याभरात शहरातील पाईपलाईन फुटण्याची हि तिसरी घटना आहे.

मंगळवारी रात्री जलवाहिनी फुटल्याचे कळताच मनपा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रात्री साडेबारा वाजता कामाला सुरुवात करण्यात आली. जलवाहिनी ज्या ठिकाणी फुटली तो पाच फुटांचा भाग गॅस कटरने कापायचा, आणि त्या ठिकाणी तेवढ्यात जाडीचा दुसरा तुकडा लावायचा हे काम सुरू करण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता किरण धांडे यांच्यासह काशिनाथ फलक, मनोज बाविस्कर, सुभाष लहाडे, आशिष वाणी, तीन वेल्डर तीन हेल्पर आणि मजूर घटनास्थळी हजर झाले काम पूर्ण होईपर्यंत अधिकारी या ठिकाणी होते.

जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला ७०० आणि १२०० मिलीमीटर व्यासाच्या दोन योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या योजनांतील दोन्हीही जलवाहिन्या आजघडीला डेटबार झाल्या आहेत. त्यामुळे या जलवाहिन्या वारंवार जागोजागी फुटून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. मागील आठवड्यात २ जून रोजी पैठणजवळील पिंपळवाडी येथे ७०० मिलीमीटर व्यासाची जुनी वाहिनी फुटली होती. त्याआधी देखील रेल्वे स्टेशन, इसारवाडी, चिकलठाणा येथील पाईपलाईन फुटली होती. शहरवासीयांना मात्र याची मोठी शिक्षा मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP