औरंगाबाद प्राणिसंग्रहालातील वाघ जाणार, रंगीत पक्षी येणार

टीम महाराष्ट्र देशा : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच 12 एवढी वाघांची संख्या झाली आहे. त्यामुळे मुंबई येथील राणीच्या बागेत दोन वाघांची मागणी करण्यात आली आहे. वाघ देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, या वाघांच्या बदल्यात दहा रंगीत पक्षी घेतले जाणार आहेत. त्यासोबत अस्वल आणि चित्त्यांची जोडी आणण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

अपुरी जागा, चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेले प्राण्यांचे पिंजरे, मास्टर प्लानकडे झालेले दुर्लक्ष यामुळे महापालिकेचे प्राणिसंग्रहालय अडचणीत आले आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालयाची मंजुरीदेखील रद्द केली होती. दरम्यान, प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या जास्त झाल्याचा मुद्दा समोर आला आहे. एप्रिल महिन्यात समृद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे वाघांची संख्या 12 वर पोचली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने राणीच्या बागेत दोन वाघ मिळावेत, अशी मागणी केली होती.

सोलापूर येथूनही वाघाची मागणी झाली आहे. मात्र, मुंबई येथील राणीच्या बागेत दोन वाघ पाठविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्यानंतर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील दोन वाघ मुंबईला पाठविण्यापूर्वी तेथे वाघांसाठी सोयी-सुविधा आहेत का? याची पाहणी करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. वाघांच्या बदल्यात मुंबई येथून दहा रंगीत पक्षांची मागणी करण्यात आली आहे. तसेच हेमलकसा येथून अस्वलांची जोडी आणण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. अस्वल घेऊन जा, असे पत्रही महापालिकेला पाठविण्यात आले आहे. प्राणिसंग्रहालयातील हत्ती गेल्यामुळे या ठिकाणी अस्वल ठेवले जाणार आहेत.