औरंगाबाद : तरुणाने बनवले कोरोना विषाणूपासून बचाव करणारे ‘हॅन्ड ग्लोज’

hand glose

औरंगाबाद- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढता आहे. अनेक उद्योग व्यवसाय प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झाले आहे. त्यामुळे वस्तू आणि पैशांची देवाणघेवाण वाढली आहे. त्यातूनही कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने यावर शिऊर येथील होतकरु तसेच संशोधक तरुणाने जालीम उपाय शोधला आहे.

कुठल्याही वस्तूला स्पर्श करण्याआधी व नंतर सॅनेटाईझरने हात धुवून स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वस्तरावर आग्रह धरला जात आहे. त्यातून कोव्हिड १९ या घातक विषाणूंना दूर ठेवता येते असा आरोग्य विभागाचा दावा आहे. त्यामुळे अनेकजण सॅनेटाईझर वापरण्याची सवय लावून घेत आहेत. हीच सवय कायम रहावी आणि सॅनेटाईझरची बाटली संभाळण्यापासून मुक्तता मिळण्यासाठी सॅनेटाईझरचा वापर करताना येणाऱ्या अडचणीतुन या तरुणाने मार्ग काढला आहे.

त्याने तळहाताने कुठल्याही वस्तूवर सॅनिटायझर स्प्रे करू शकणारे आणि आपल्या हाताला सुरक्षित ठेऊ शकणाऱ्या हॅन्डग्लोजची निर्मिती केली आहे. त्यातून कुठल्याही वस्तूला स्पर्श करण्यापूर्वी त्यात ठेवलेल्या वस्तूवर हात नेल्यास सेन्सरमुळे सॅनिटायझर स्प्रे करता येऊन वस्तूला निर्जंतुकीकरण करता येणार असल्याचा दावा त्याने केला आहे. अशोक चांगदेव त्रिभुवन असे त्या संशोधक तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या संशोधनाला कोरोना सेफ्टी हॅन्डग्लोज असे अशोकने नाव दिले आहे.

संशोधन करण्याची धडपड, जिज्ञासा आणि कुतूहल यातून त्याने अनेक शोध लावले आहे. एका टेलरने शिवलेला कापडी हॅन्डग्लोज मध्ये सेन्सर किट वापरून त्याने या हॅन्डग्लोजची निर्मिती केली आहे. भविष्यात बँक कर्मचारी, दुकानदार, व्यावसायिक तसेच दैनंदिन व्यवहार करणाऱ्यांना ह्या हॅन्डग्लोजचा उपयोग होऊ शकतो.महाविद्यालयीन विज्ञान प्रदर्शनात अशोकच्या अनेक प्रयोगाला बक्षीस मिळाले आहे.